
नागपूर : ‘टार्गेट थेरपी’ कागदावरच
नागपूर : न्युक्लिअर मेडिसिन ही वेदनारहित व रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे हे सांगणारी महत्त्वाची उपचारपद्धती असून टार्गेट थेरपी म्हणून विकसित झाली. मेडिकलमध्ये हा विभाग उभारण्याची घोषणा २०१७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत २५ कोटी देण्याचे सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात हा निधी ५ वर्षानंतरही निधी मिळाला नाही, हा विभाग आकाराला आला नाही. यामुळे कॅन्सर, हृदयविकाराचे रुग्ण अत्याधुनिक पद्धतीच्या निदानापासून वंचित राहिले आहेत.
नागपुरातील मेडिकलसह विविध सरकारी व खासगी रुग्णालयात दरवर्षी २० हजारावर कॅन्सरग्रस्तांची आणि सुपरमध्ये मोठ्या प्रमाणात ह्दयरुग्णांची नोंद होते. हत्तीरोगाच्या रुग्णावर येथे शस्त्रक्रिया होतात. गरिबांसाठी वरदान ठरणारा न्युक्लिअर मेडिसीन विभाग मेडिकलमध्ये उभारता न आल्याने ते दर्जेदार उपचारापासून गरीब वंचित राहिले आहेत. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी नावीन्य योजनेअंतर्गत या विभागासाठी पुढाकार घेतला होता. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर यांनी मेडिकलच्या विस्तारीकरणासाठी ७५ कोटीचा निधी देण्याची घोषणा केली होती. यातील पहिला टप्पा २०१७ मध्ये २५ कोटी मिळणार होता. मात्र २०१७ ते २०१९ या कालावधीतही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
राज्यात प्रथमच मेडिकलमध्ये ही आधुनिक निदान व उपचारपद्धती विकसित होणार होती. परंतु तत्कालीन शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा विभाग मेडिकमध्ये तयार झाला नाही. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
हत्तीरोगासह हृदय, कॅन्सरपर्यंत होते निदान
हत्तीरोगावरील शस्त्रक्रियेसाठी न्युक्लिअर मेडिसिन प्रभावी ठरते. न्युक्लिअर मेडिसिनमुळे हृदय, मूत्रपिंड, यकृताची कार्यक्षमता तसेच यासंबंधीच्या विविध आजारांची नेमकी माहिती कळते. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर व त्याची अवस्था कळणेही शक्य होते. थायरॉइडच्या आजारांविषयीही न्युक्लिअर मेडिसिनमुळे कळणे शक्य होते. गॅमा कॅमेराच्या माध्यमातून कॅन्सर आहे की नाही, कॅन्सर झाला असल्यास ट्रिटमेंटला किती प्रतिसाद मिळत आहे, किती पेशी बाधित आहेत, याचे सुक्ष्म निरीक्षण न्युक्लिअर मेडिसीनमध्ये होते. नेमक्या अवयवाला बाधा झाली असेल त्याचा किती भाग निकामी झाला आहे, याची माहिती मिळते. ट्रिटमेंटने किती प्रमाणात सुधारणा होते, या बाबी न्युक्लिअर थेरपीतून कळतात.