Nagpur : ‘मोबाईल ॲप’ पाहून मुलाने लावला गळफास Nagpur mobile app Boy hanged himself after police investigation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गळफास

Nagpur : ‘मोबाईल ॲप’ पाहून मुलाने लावला गळफास

नागपूर : मोबाईलमधील ‘ॲप’ बघून त्यानुसार कृती करणाऱ्याच्या नादात एका १२ वर्षीय मुलाने ओढणीने गळफास घेत जीव गमावला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.२५) सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

अग्रण्य सचिन बारापात्रे (वय १२ रा. सोमवारी क्वार्टर) असे या मुलाचे नाव आहे. तो अजनीतील केंद्रीय विद्यालयात ८ व्या वर्गात शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुरेश बारापात्रे (वय ४०) हे परिसरात नानासाहेब राऊत यांच्या घरी भाड्याने राहतात. बुधवारी दुपारच्या सुमारास शेजारी राहणारे किशोर पांडुरंग चिखले (रा. सोमवारी क्वार्टर) यांच्या टेरेसवर अग्रण्य खेळायला गेला होता.

दरम्यान वडील काही कामानिमित्त बाहेर तर आई घरकामात व्यस्त होती. काही वेळ अग्रण्यने पतंग उडविली. त्यानंतर तिथेच असलेल्या लाकडी शिडीवर तो आजुबाजूच्या नागरिकांना खेळताना दिसला. मात्र, त्यानंतर सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या सुमारास टेरेसवर असलेल्या लाकडी शिडीला ओढणीने लटकला असल्याचे बाजुला असलेल्या इमारतीमधील नागरिकाला तो आढळला. याची माहिती त्यांनी घरमालक किशोर चिखले यांना दिली. त्यांनी धावत छतावर जाऊन बघीतले तेव्हा तो ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळला. याची माहिती घरी असलेल्या आईला दिली.

‘मोबाईल ॲप’ पाहून मुलाने लावला गळफास

त्यांनी आणि घरमालकांनी त्याला मेडिकल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अग्रण्यची आई गृहिणी असून त्याचे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करतात.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्यला मोबाईलचे वेड होते. त्याने आईच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप डाऊनलोड केले होते. त्यापैकीच एका ॲपमध्ये गळ्यात दोर लटकवून तो कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत होता.

त्यातूनच बुधवारी त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून लागलेल्या गळफासात त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. सक्करदरा पोलिसांना मिळालेल्या सुचनेवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

एम्स’मध्ये सुरू होता उपचार

अग्रण्य एकुलता एक असल्याने तडतड्या स्वभावाचा होता. तसेच स्वभावाने तापट असल्याने कुठल्याही गोष्टीत तो लवकरच रिॲक्ट होत असल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला एम्स येथील एका डॉक्टरांनाही दाखविले होते. त्यात त्याला एक मानसिक आजार असल्याचेही समोर आले होते. त्यासाठी त्याला औषधही देण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे.