
नागपूर : पावसाळ्यात वीज पुरवठा अखंडित ठेवण्याचे आव्हान
नागपूर : थोडाजरी वारा, पाऊस आला तरी वीज पुरवठा बंद ठेवून वेळ मारून नेली जाते. त्याचा त्रास ग्राहकांना होतो. त्यामुळे पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणने कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असते. त्यामुळे वादळ-वारा, जोराचा पाऊस आला तर या उघड्यावरील यंत्रणेवर परिणाम होतो. पावसाळ्यात महापालिकेमार्फतही खोदकाम सुरू असते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हामुळे भूमिगत वाहिन्यांवर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरुवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व त्यात बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आद्रता निर्माण होते.
त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डिस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनी मातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात येऊ नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्त्वाचे असतात. उन्हामुळे चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) का र्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.
या कारणांमुळे होतो वीज पुरवठा खंडित
वीज यंत्रणेवर वादळामुळे किंवा वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो.