
वाढत्या कोरोना बाधितांमुळे ‘टेंशन’
नागपूर - जिल्ह्यात व शहरात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. शहरात गुरुवारी सात बाधित आढळून आले. सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येने महापालिका सतर्क झाली असून लक्षणे दिसताच चाचणी करण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. डोस घेण्याचे टाळणाऱ्यांनी तत्काळ दोन्ही डोस घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. गुरुवारी कोरोना संक्रमणाचा दरही दोनपेक्षा जास्त आढळला. बुधवारी शहरात चार तर आज सात बाधित आढळून आले. त्यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. शहरात सध्या ३६ केंद्रांवर निःशुल्क कोरोना चाचणी केली जात आहे.
बाहेरून शहरात येत असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या संपर्कातील लोकांची सुद्धा त्वरित चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. नागपुरात लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या २१,८९,०२५ असून पहिला डोस २१,७१,३९६ नागरिकांनी आणि १७,३२,४५४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
७९ टक्के नागरिकांनीच घेतला दुसरा डोस
शहरातील ९९ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हिड लसीकरणाचा पहिला डोस घेतला. परंतु दुसरा डोस ७९ टक्के नागरिकांनीच घेतला आहे. १८ वर्षावरील वयोगटात १०४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ८४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १५ ते १७ वर्ष वयोगटातील ६६ टक्के पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून ५० टक्के तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटामध्ये ३९ टक्के मुलांनी पहिला आणि १६ टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ ते ५९ वयोगातील ५१०८ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
Web Title: Nagpur Municipal Alert On Rising Corona Infestation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..