
नागपूर : आता भाजपची ‘ओबीसी’ परीक्षा
नागपूर : महाविकास आघाडीच्या संथ कारभारामुळे ओबीसींचे आरक्षण गेले, असा आरोप करणाऱ्या भाजपला आता आरक्षण मिळवून देण्यासाठी अवघड परीक्षा द्यावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपच्या हाती सत्ता द्या, एक महिन्याच्या आत आरक्षण मिळवून देतो’ असा दावा केला होता. तो खरा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण फेटाळून लावल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप व महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यायची नाही असे जाहीर केले होते. मात्र लगेच झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षाला याचा विसर पडला. सहानुभूती मिळवण्यासाठी आघाडी व भाजपने सर्व उमेदवार ओबीसींचे देऊन वेळ मारून नेली होती.
बांठिया आयोगाच्या आडनावावरून जात निश्चित करण्याच्या चुकीच्या पद्धतीकडे फडणवीस यांनीच लक्ष वेधले होते. नंतर ओबीसींचे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही ही चूक मान्य केली होती.
प्रश्न मार्गी लावण्याची संधी
इम्पेरिकल डाटा गोळा करायला उशीर केला, समर्पित आयोगाला निधी आणि मनुष्यबळ दिले नाही, महाविकास आघाडीलाच आरक्षण द्यायचे नाही, असे आरोपही भाजपने केले होते. माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस रोजच बाईट देऊन महाविकास आघाडीवर आरोप करीत होते. आता भाजपच्याच हातात राज्याची सत्ता आली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची संधी चालून आली आहे.
Web Title: Nagpur Municipal Corporation Election Obc Reservation Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..