Nagpur : मोकाट कुत्र्यांना अन्न द्यायचे असेल तर दत्तक घ्या ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur stray dogs

Nagpur : मोकाट कुत्र्यांना अन्न द्यायचे असेल तर दत्तक घ्या !

नागपूर : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने शुक्रवारी नियमावली जाहीर केली. मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांना खाऊ घालायचे असेल तर आता त्यांना दत्तक घ्यावे लागणार आहे. यासाठी महापालिकेत नोंद करावी लागणार आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांवरील प्रेम करणे आता संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे.

मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. उच्च न्यायालयाने श्‍वानप्रेमींचे चांगलेच कान टोचले असून महापालिकेनेही आता त्यानुसार नियमावली जाहीर केली. श्वानप्रेमींना आता सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना कुठलेही पदार्थ खाऊ घालता येणार नाही.

मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्यावर दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्याबाबत तक्रार आली तर लगेच संबंधितांवर दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांना खाऊ घालण्याची इच्छा झाल्यास सर्वप्रथम कुत्र्यांना दत्तक घ्यावे लागणार आहे.

कुत्र्याला घरी आणण्यासाठी महापालिकेकडे रितसर नोंदणी करावी लागणार आहे. घरी जागा नसेल तर त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेवावे लागणार आहे. एवढेच नव्हे त्यांचे लसीकरण व आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता नागपूरकरांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

मोकाट कुत्र्यांना पकडणाऱ्या पथकाला विरोध केल्यास गुन्हा

मोकाट कुत्र्यांना पकडणाऱ्या महानगरपालिकेच्या पथकाला कुणीही व्यक्तींनी विरोध केल्यास किंवा कारवाईत अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेयान्वये गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी मनपाच्या समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) पाठवावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.