
Nagpur Crime News: विळ्याने वार करून मुलाने आईला संपविले
Nagpur Crime News : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने विळ्याने वार करीत आईचाच खून केला. ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस हद्दीतील वनदेवीनगरात सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान मुलाने पोलिस ठाण्यात येऊन स्वतःच खुनाची माहिती दिल्यावर पोलिसांनी मुलाला अटक केली.
गोविंद संतराम काटेकर (वय २८) असे आरोपीचे नाव असून विमलाबाई संतराम काटेकर (वय ६०) असे मृत वृद्ध आईचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद काटेकर दारूच्या व्यसनामुळे कुठलेही काम करीत नव्हता. सातत्याने दारू पिण्यासाठी आईकडे पैशाची मागणी करायचा. त्यातून त्याने अनेकदा म्हाताऱ्या आईला मारहाणही केली होती.
दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास त्याचे दारुच्या पैशासाठी आईसोबत भांडण झाले. आई वृद्ध असल्याने कुठलेही काम करीत नव्हती. त्यामुळे तिने पैसे कुठून आणू असे म्हटले.
यामुळे संताप अनावर होऊन त्याने विळ्याने वार करीत आईचा खून केला. त्यानंतर स्वतः पोलिस ठाणे गाठून खुनाची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोत पाठविला.
सांयकाळी गाठले ठाणे
वनदेवी परिसरात गोविंद एका सात रुमच्या घरात आईसह वास्तव्यास होता. आज सकाळी त्याने आईला दारुसाठी पैसे मागितले. मात्र, तिच्याकडे पैसेच नसल्याने तिने नकार दिला.
त्यावरुन घरातील तिसऱ्या क्रमांकाच्या खोलीत गोविंदने सकाळच्या सुमारास आईवर विळ्याने वार करीत खून केला. त्यानंतर दिवसभर फिरुन त्याने सांयकाळी पोलिस ठाणे गाठले.
भावाने गोविंदच्या त्रासाने सोडले घर
गोविंदचे वडील हमालीचे काम करायचे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्याला मनोज नामक मोठा भाऊ असून तोही हमालीचे काम करीत असून आपल्या कुटुंबासह कळमना परिसरात राहतो. त्याने काही वर्षांपूर्वीच गोविंदच्या स्वभावामुळे घर सोडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.