

नागपूर - दोन दिवसांपूर्वी एका मातेची शस्त्रक्रियेतून प्रसूती झाली. बाळ कमी दिवसांचे तसेच कमी वजनाचे असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. मातेला प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झाली. यामुळे तिच्यावरही उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर २४ तासांतच बाळही दगावले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात धुडगूस घातला. इतर रुग्णांचे नातेवाईक आल्याने आणि सुरक्षारक्षक तैनात झाल्याने प्रकरण निवळले.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील शिवानी नेवारे. ९ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पोटात कळा आल्या. तिल मेडिकलमध्ये आणले. १२ ऑक्टोबरला शस्त्रक्रियेतून प्रसूती झाली. शिवानीची प्रकृती खालावली होती. यामुळे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान बाळ कमी वजनाचे असल्याने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक ५०) त्याच्यावर उपचार सुरू होते.
रविवार १५ ऑक्टोबरला शिवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १६ ऑक्टोबर सोमवारी बाळही दगावले. एकापाठोपाठ आई आणि मुलाचा मृत्यू झाला. यामुळे नातेवाईक संतप्त झाले. आठ ते दहा नातेवाईक बालरोग अतिदक्षता विभागात शिरले आणि गोंधळ घालणे सुरू केले. सुरक्षारक्षक त्यावेळी तैनात नव्हते. यामुळे त्यांना निवासी डॉक्टर व परिचारिकांनी रोखले. परंतु नातेवाइकांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवले. इतर रुग्णांच्या नातेवाइकांनी मध्यस्थी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मेडिकल प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागाच्या बाहेर सुरक्षा रक्षकांना तैनात केले. या घटनेबाबत चौकशी समितीही नेमल्याची माहिती आहे.
आईच्या पाठोपाठ २४ तासांत बाळाचा मृत्यू
यापूर्वीची मारहाण
मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात ‘शल्यक्रियागृह जी’मध्ये कार्यरत एका मदतनिसाने (अटेंडन्ट) महिला नातेवाईकाला मारहाण केली होती. नातेवाइकांनी यावर संताप व्यक्त केला होता. मदतनिसावर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकाने मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु यानंतर या प्रकरणाचे काय झाले हेच कळले नाही. या प्रकरणातही चौकशी समिती गठित होईल, परंतु तिचा अहवाल केव्हा ? अहवाल आलाच तर त्यानंतर सुधारणा होईल की, नाही हे सांगता येत नाही.
ना सुरक्षारक्षक, ना प्रवेशद्वार
येथील वॉर्ड क्र. ५० हा लहान मुलांचा अतिदक्षता विभाग आहे. नवजात शिशू काळजी केंद्र, तसेच लहान मुलांचा अतिदक्षता विभाग (‘पीयआयसीयू’ व ‘एनआयसीयू’) अशा दोन विभागात हा वॉर्ड विभागला आहे. यात २०-२० खाटा आहेत. या विभागाला प्रवेशद्वार नाही आणि सुरक्षा रक्षक तैनात नाही. यामुळे संतप्त नातेवाइकांना थेट अतिदक्षता विभागात शिरता येते. यापूर्वीही असा प्रकार येथे झाला असल्याच्या माहितीला दुजोरा देण्यात आला.
प्रसूत माता दगावल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळ दगावले. याबाबत नातेवाईकांना माहिती दिली असता ते आलेच नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हे दगावलेले बाळ आमचे नाही, असे सांगत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली.
- डॉ. मनीष तिवारी, विभाग प्रमुख, मेडिकल, बालरोग विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.