Nagpur News : ग्राहकांनो, सिलिंडरचे वजन तपासून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Gas cylinder

Nagpur News : ग्राहकांनो, सिलिंडरचे वजन तपासून घ्या

नागपूर : गॅस सिलिंडरचे वजन नमूद केल्याप्रमाणे योग्य आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे. मात्र, घरपोच सिलिंडर पोहोचविणाऱ्या डिलिव्हर बॉयकडून वजनच करून मिळत नाही. कुणी त्याबाबत आग्रहही करीत नाही. अनेकदा वजन कमी असल्याची शंका व्यक्त होते. परंतु डिलिव्हर बॉयकडून तत्काळ सिलिंडरचे वजन करून मिळते, याची अनेक ग्राहकांना माहितीच नाही. ‘सकाळ’ने काही एजन्सीच्या डिलिव्हर बॉयकडून वजन करण्याची मागणी केली असता त्यांच्याकडे वेइंग मशीनच नसल्याचे आढळले.

सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. सिलिंडरचे दरही आकाशाला भिडले आहेत. परंतु जीवनावश्यक असल्याने ते घ्यावेच लागते. पैसे पूर्ण घेता, मग योग्य वजनही द्या एवढीच ग्राहकांची माफक अपेक्षा आहे. ग्राहकांकडून ओरड झाल्यानंतर शासकीय गॅस कंपन्यांनी आपली मानगूट सोडविण्यासाठी दारावर वजन करून सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला. सिलिंडर घरी आणणाऱ्यांकडे इलेक्ट्रॉनिक काटा सोपवून भारत, एचपी, इंडियन या निमसरकारी गॅस कंपन्यांनी आपलीच पाठ थोपटून घेतली. ग्राहकांना खरेच सिलिंडर मोजून दिले जाते आहे का? याची खातरजमा केली जात नाही.

नियम काय म्हणतो?

ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी देण्यापूर्वी वजन करूनच द्यावे. त्यानंतरच ते ग्राहकांना द्यावे. सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनात वजन मशीन असणे आवश्यक आहे. जर ग्राहकाने सिलिंडरचे वजन करून मागितले तर त्याला डिलिव्हरी बॉयने तातडीने सिलिंडरचे वजन करून देणे आवश्यक आहे. पण, अनेक गॅस एजन्सी या नियमांचे पालन करीत नाही. होम डिलिव्हरी करणाऱ्या एकाही वाहनात वजन मशीन नसल्याचे चित्र आहे.

एवढे नक्‍की कराच

गॅस सिलिंडर घेण्यापूर्वी सिलिंडरला सील आहे की नाही हे तपासून पाहा.

ग्राहकांनी संबंधित व्यक्तीकडून सिलिंडरचे वजन करून घ्यावे.

सिलिंडरचे वजन आणि गॅससह सिलिंडरचे वजन सिलिंडरवरच नमूद असते. त्यात तफावत आढळल्यास तत्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

सिलिंडर घेण्यापूर्वी वजन तपासून घेणे हा ग्राहकाचा हक्क आहे. सिलिंडरच्या गोल कडीला आधार देणाऱ्या तीन पट्ट्यांपैकी एका पट्टीवर आतल्या बाजूस रिकाम्या सिलिंडरचे वजन नमूद असते.

जर १४.५ किलो वजन नमूद केलेल्या सिलिंडरवर १५० ग्रॅम कमी किंवा अधिक असले तरी ते सिलिंडर योग्य समजावे.

...तर रद्द होऊ शकते एजन्सी!

कोणत्याही गॅस एजन्सीविरुद्ध वजनाबाबत कंपनीपर्यंत तक्रार येत असेल तर त्या डिस्ट्रिब्यूटरची एजन्सी रद्द होऊ शकते. एजन्सीकडून वजनाबाबत खात्री करूनच ग्राहकांना सिलिंडर द्यावे. असे जर होत नसेल तर संबंधित एजन्सीविरुद्ध ग्राहकांनी तक्रार करावी.