Nagpur: मरणानंतरही थांबत नाहीत नरक यातना; स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने, मृतदेहांची अवहेलना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur: मरणानंतरही थांबत नाहीत नरक यातना; स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने, मृतदेहांची अवहेलना

Nagpur: मरणानंतरही थांबत नाहीत नरक यातना; स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने, मृतदेहांची अवहेलना

केनवड: स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अस्तित्वात नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये गणेशपुर येथील कोणाचे निधन झाल्यास मरणानंतर ही नरक यातना भोगाव्या लागतात. या गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे.

गणेशपुर येथील लोकसंख्या सहाशेच्यावर असून कुकसा-गणेशपुर गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे, परंतू गणेशपुर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याअभावी मृतदेहाची झालेली अवहेलना गावकरी कधीच विसरू शकत नाहीत.

पावसाळ्यात एका वयोवृद्ध मागासवर्गीय अल्प समाजातील पुरुषाचे निधन झाले. त्यावेळी सकाळपासूनच संततधार पावसामुळे व स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्याने अखेर कुटुंबाने गणेशपुर व केनवड या रस्त्यालगत असलेल्या केनवड येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार उरकण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर लगेच तीन चार दिवसानंतर रात्रीचे वेळेस दुसऱ्या समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला. परंतु स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ताच नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला दुसऱ्याच्या जागेमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आला. ही बाब नित्याचीच झाली. त्यामुळे गावकरी संतप्त झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

खेडोपाडी अजूनही स्मशानभूमीकरीता प्रतीक्षा करावी लागते हे न उलगडणारे कोडे आहे. सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडतो. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर पुन्हा लाकडे टाकावी लागतात.

गणेशपुर येथे सात-आठ वर्षांपासून स्मशानभूमी अस्तित्वात आहे, परंतु अद्याप त्याठिकाणी एकही अंत्यसंस्कार पार पडला नाही. त्याचे कारण स्मशानभूमीला जायला रस्ताच नाही व सर्व बाजूला काटेरी झाडेझुडपे वाढली असून, स्मशानभूमी परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.

अंत्यसंस्कारसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे स्मशानभुमीची त्वरीत दुरुस्ती करून, स्वच्छ करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.

गावाच्याजवळ असणाऱ्या स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य आहे. अवतीभोवती काटेरी झाडीझुडपे आहेत. लाईटची सुविधा नाही, बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा नाही.

अशा अनेक समस्यांच्या विळख्यात स्मशानभूमी अडकलेली असून अंत्यसंस्कार करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून स्वच्छतेसह इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

अनेक वर्षापासून स्मशानभूमीचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छतेच्या बाबतीत कायमस्वरूपी उदासीन दुर्लक्षित धोरण आहे.

कमालीची अस्वच्छता आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच घाण केली जाते. स्वच्छतेची वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रिसोड तालुक्यातील अनेक वाड्यावस्तींना आजही स्वतंत्र स्मशानभूमी नाही. ज्या गावांसाठी स्मशाने आहेत, त्यातील बहुतेक बिकट अवस्थेत आहेत.

प्रशासन, लोकप्रतीनिधी स्मशानाबाबत गंभीर होतील का ? भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे विकासाच्या बाता मारणाऱ्यांनी किमान अखेरचा प्रवास सुखकर करावा, हिच भावना व्यक्त झाली.

फक्त मतदानापुरतेच गावाकडे पाहिले जात नाही ना, हा सुध्दा प्रश्न या निमित्ताने उपस्थिती झाला आहे.

आता तरी याकडे ग्राम सेवक, जिल्हा परिषद सदस्य, खासदार, आमदार, प्रशासन लक्ष देतील का? हे पाहावे लागणार आहे. पंधरा दिवसावर पावसाळा येऊन ठेपला असून याकडे कोणी लक्ष देईल का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nagpur