Nagpur: एनआयटीच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाच घेताना अटक

नागपूर : एनआयटीच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या वृद्धाकडून भूखंडाचे आरएल लेटर काढून देण्यासाठी एनआयटीच्या कर्मचाऱ्याने १५ हजारांची लाच मागितली. एनआयटी कार्यालयातच लाच स्वीकारताना कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. विजय गौरीनंदनसिंह चौहान (वय ५०) असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार वृद्ध शासकीय सेवेतून नुकताच निवृत्त झाले असून इंद्रप्रस्थनगरात राहतात. त्यांनी २००७-०८ ला मौजा भामटी परिसरातील एका ले-आऊटमध्ये दोन भूखंड खरेदी केले होते. दोन्ही भूखंडाचे आरएल आणि डिमांड लेटर काढण्यासाठी २७ एप्रिल २०२१ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या पूर्व विभाग कळमन्याच्या विभागीय कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ ला एनआयटीच्या विभागीय कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता अर्जावर काहीही काम झाले नसल्याचे दिसून आले. दरम्यान एनआयटीच्या विभागीय कार्यालयातील चपराशी विजय चौहान याने त्या वृद्धाची भेट घेतली. त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि ‘मी साहेबांना सांगून काम लवकर करून देतो.’ अशी हमी दिली.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

काही दिवसांतच विजय चौहान याने फोन केला आणि कार्यालयात बोलावून घेतले. त्याने चालानच्या नावावर १७ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी वृद्धाकडे तेवढे पैसे नसल्याने ४ हजार रुपये दिले आणि उर्वरित पैसे नंतर देण्याचे ठरले. उर्वरित १३ हजार रुपये खामला चौकात चौहानने घेतले. त्या व्यवहाराची पावती दिली नाही. त्यानंतर दोन दिवसांनंतर विजयने डिमांड आणि आरएल लेटर काढण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.

वृद्धाला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबीचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली. पीआय संजिविनी थोरात यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज बुधवारी दुपारी एनआयटी कार्यालयात सापळा रचला. विजय चौहानने पैसे स्वीकारताच एसबीने रंगेहात अटक केली. त्याच्यावर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाचेच्या रकमेत हिस्सेदार कोण?

चपराशी विजय चौहान याला आरएल आणि डिमांड लेटर काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ते लेटर काढण्यासाठी विजय याने कोणत्या अधिकाऱ्याशी हिस्सेकरी केले होते का? याबाबत एसीबी चौकशी करीत आहे. लेटर काढण्यासाठी कुणीतरी अन्य अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली होती. विजयने फक्त साहेबांपर्यंत पैसे पोहचविण्याची जबाबदारी घेतली होती, अशी चर्चा आहे.

loading image
go to top