
Nagpur News: नायलॉन मांजाने घेतला मुलाचा जीव
नागपूर : मकरसंक्रांतीतील पतंगोत्सव दिवसेंदिवस जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येते. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरा बाराखोली परिसरात नायलॉन मांजाने गळा कापलेल्या १० वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान आज (ता. १५) सकाळी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास घडली होती.
वेद कृष्णा शाहू (वय १०, रा. मिसाळ ले-आऊट, जरीपटका) असे मृताचे नाव आहे. तो महात्मा गांधी शाळेत पाचव्या वर्गात होता. वेदच्या वडिलांचे किराणा दुकान असून, घरी मोठा भाऊ आणि आई आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चारच्या सुमारास वेदची शाळी सुटली. त्याला शाळेतून आणण्यासाठी वडील कृष्णा दुचाकीने गेले. दुचाकीवर वेद समोर बसला आणि दोघेही घराच्या दिशेने निघाले. दरम्यान अचानक समोर नायलॉन मांजा आल्याने वेदचा गळा चिरल्या गेला.
त्याला उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी कोराडी मार्गावरील एका बड्या रुग्णालयात रेफर केले. मात्र, तिथेही त्याला नकार देण्यात आल्याने धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, श्वसननलिका कापल्याने आज सकाळी वेदची प्राणज्योत मालवली.
पुढल्या महिन्यात होता वाढदिवस
वेदचा पुढच्याच महिन्यात २३ फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला. त्याला अंतिम निरोप देताना आई-वडिलांसह नातेवाईकांचा हुंदका आवरत नव्हता.
नायलॉन मांजाचा दुसरा बळी
शहरात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांकडून सातत्याने नायलॉन मांजावर कारवाई सुरू आहे. तरीही पोलिसांच्या धाकाला न जुमानता मांजाविक्री सुरूच होती.
विशेष म्हणजे, कालच पतंग पकडण्याच्या नादात ११ वर्षीय वंश धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा करुण अंत झाला. ही घटना ताजीच असताना आज आणखी एक निरागस जीव मांजाचा बळी ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मेयो, मेडिकलमध्ये १७ जणांवर उपचार
रविवारी (ता.१५) मांजामुळे जखमी झालेल्यांना मेयो, मेडिकलमध्ये उपचार करून घरी पाठविण्यात आले. मांजाने कुणाचा हात तर कुणाचा चेहरा कापला गेला.
गच्चीवरून पडलेल्या आठ वर्षीय चिमुकल्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांना मलमपट्टी करून घरी सोडण्यात आले.
मांजामुळे पक्षीसुद्धा जखमी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. याशिवाय शेकडो जखमींनी खासगी रुग्णालयातही उपचार केले.