नागपूर : वीजजोडणीसाठी ऑनलाइनही करता येणार अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur online electricity connection Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana

नागपूर : वीजजोडणीसाठी ऑनलाइनही करता येणार अर्ज

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त राज्यभरातील अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील व्यक्तीचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी पूर्वी १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ पर्यंत होता. आता या योजनेला ६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर परिमंडळात अनुसूचित जातीच्या ४५२० तर अनुसूचित जमातीच्या १५३५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मध्ये लाभार्थी अर्जदारांना घरगुती वीजजोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे. या वीजजोडणीसाठी महावितरणकडे केवळ ५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

वीजजोडणीचा अर्ज महावितरणकडून मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी तसेच इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधित लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.