
नागपूर - नोटबंदी, ऑनलाइन खरेदी आणि कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक व्यवसाय डबघाईस आले. बावीस वर्षापूर्वी शहरात आलेल्या मॉल संस्कृतीमुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या संस्कृतीला ग्रहण लागले आहे. आज शहरात फक्त १० टक्के मॉल तुफान चालत आहेत. ४० टक्के मॉलचा दर्जा यथातथा आहे तर ५० टक्के मॉलची स्थिती बिकट झालेली आहे. लोकांना मॉलच्या एका छताखाली सगळे काही हवे आहे. खरेदीचा आनंद, माफक दरात चीजवस्तू, करमणूक आणि मागणी तसा पुरवठा हे बाजाराचे तत्त्व असते. या तत्त्वाचा ज्याला विसर पडतो, त्याचा बाजार उठतो. हे तत्त्व मॉललाही लागू होत होते.
शहरात बावीस ते पंचवीस वर्षापूर्वी सदर पूनम मॉल पहिल्यांदा सुरु झाला. त्यानंतर रामदासपेठ येथे सुरु झालेल्या मॉलनंतर शहरात विविध ठिकाणी मॉलची संस्कृती रुजली. आता मात्र, शहरातील वीस ते बावीस मॉल झपाट्याने उभे राहिले खरे पण अल्पावधीत यापैकी अनेक मॉल्सचे शटर खाली आले. तर काही मॉल रडतखडत सुरू आहेत. शहरातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच मॉल आपला लौकिक टिकवून ठेवून आहेत.
मॉल उभारल्यावर त्याचा मालकी हक्क किती जणांकडे आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. कोणा एकाकडेच मालकी हक्क असतील तर एकसूत्रता राहते, व्यवस्थापनात नियोजन राहते, मॉलमधील गाळे कुणाला द्यायचे याचे निर्णय स्वातंत्र्य असते. लोकांना आकर्षित करण्याकरिता मॉलमध्ये कोणते इव्हेंट कधी करायचे याचे स्वातंत्र्य असते. परंतु, मालकांनी हे स्वातंत्र्य स्वतःकडे ठेवले नाही. त्यांनी मॉलचा ताबा गुंतवणुकदारांकडे दिला. जास्तीत जास्त फायदा होत नाही तोपर्यंत गुंतवणूकदार स्वतःकडील प्रॉपर्टी कधीच विकत नाहीत. निवासी संकुलातील काही गाळे हे गुंतवणूकदारांचे असतात. प्रत्यक्ष मालकाकडून ग्राहकाने घेतलेले घर आणि गुंतवणूकदारांकडूनच घेतलेल्या घराच्या दरापेक्षा कमी असते. कारण गुंतवणूकदार जास्त फायदा मिळेल, तेव्हाच विक्री करत असतो. हाच प्रकार मॉलच्या व्यवस्थापनात दिसून आला.
ढिसाळ व्यवस्थापन
ढिसाळ व्यवस्थापन, मालकी हक्काचे चुकीचे वाटप, गुंतवणूकदारांची मनमानी, ग्राहकांच्या गरजेकडे दुर्लक्ष, अंतर्गत रचना अर्थात इंटेरिअरबाबत उदासीनता, आसपासच्या परिसराचा-स्थानकांच्या क्रयशक्तीबाबत अभ्यासाचा अभाव आणि निव्वळ स्पर्धा या प्रमुख कारणांमुळे अनेक मॉल्स डबघाईला आलेत. तर काही तर बंदच पडले.
अनेक गाळे रिकामेच
फायद्याचा विचार करून गुंतवणूकदारांनी आपले गाळे कुणालाही विकले. ज्यांना चढे दर परवडले त्यांनी घेतले, आणि ज्या गाळ्यांना प्रतिसादच मिळाला नाही, ते पडून राहिले. पडून राहिलेले-बंद असलेले गाळे हे मॉलच्या प्रतिमेला तडा देतात. गाळे बंद असतील तर ग्राहकांच्या नजरेत मॉलचे महत्त्व कमी झालेल आहे. रस्त्यांवर गल्ल्या-गल्ल्यांमध्ये जशी दुकाने असतात, त्या धर्तीवर या मॉलमधील गाळे आहेत. या गल्ल्यांमधून दुकाने शोधताना ग्राहकांची दमछाक व्हायची. आता तर हे मॉल खंडहरच झाले असून मॉलमधील ‘गल्ल्यां’मध्ये कॉलेजचे तरुण-तरुणी गुफ्तगु करताना दिसतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नोटबंदीमुळे ग्राहकांची खरेदीक्षमता कमी झालेली आहे. शहरात रोजगार निर्मिती होईल, असे कोणतेही नवे उद्योग आलेले नाहीत. त्यामुळे रोजगार निर्माण होण्यापेक्षा कोरोनामुळे रोजगार केल्याने ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाल्याने मॉल बंद पडू लागले आहे. तसेच काही मोठ्या उद्योजकांमध्येही सामंजस्य करारावरून वाद वाढलेला असल्याने काही मॉल बंद झालेले आहेत.
- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ
नागपूर हे सेवानिवृत्त लोकांचे शहर झालेले आहे. येथील विद्यार्थी शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेरच्या राज्यात अथवा पुणे, मुंबईकडे जातात. तेथेच स्थायिक होत आहेत. खरेदीक्षम युवावर्गच मॉलमध्ये जाऊन खरेदी करीत असतात. ती संख्याच शहरात कमी आहे. येथील ग्राहकांची मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याची क्रयशक्ती कमी असल्याने मॉलची स्थिती गंभीर झालेली आहे.
- दीपेन अग्रवाल अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲण्ड ट्रेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.