नागपूरी संत्रा म्हणून होणार विदर्भातील फळाचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डींग - नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

आजच्या काळात ब्रॅण्डला महत्व आहे. त्यामुळे "नागपूरी संत्रा' म्हणून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची टिव्ही, रेडीओ आणि विविध माध्यमांचा वापर करीत जाहिरात झाली पाहिजे.

Orange Fruit : नागपूरी संत्रा म्हणून होणार विदर्भातील फळाचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डींग - नितीन गडकरी

नागपूर - आजच्या काळात ब्रॅण्डला महत्व आहे. त्यामुळे "नागपूरी संत्रा' म्हणून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची टिव्ही, रेडीओ आणि विविध माध्यमांचा वापर करीत जाहिरात झाली पाहिजे. जगभरात ज्युसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे टेबलफ्रुट म्हणूनच आपल्याला या संत्र्याचे नावलौकीक वाढवावा लागणार आहे. त्यासाठी महाऑरेंज, केंद्रिय लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांनी संयुक्‍तपणे ऍक्‍शन प्लॅन तयार करण्याची सूचना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

ऍग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या निमित्ताने संत्रा उत्पादकांसाठी आयोजीत कार्यशाळेत ते शनिवारी (ता.26) बोलत होते. महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ, प्रशांत कुकडे, बदनापूर (जि.जालना) येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.संजय पाटील, केंद्रिय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, डॉ. विनोद राऊत, डॉ.डी.एम.पंचभाई, डॉ. आर. एन. काटकर यांची यावेळी उपस्थिती होती. ना. गडकरी पुढे म्हणाले, जागतीकस्तरावर विविध संत्रा वाणाचे एकरी उत्पादन 90 टन आहे. नागपूरी संत्र्याची उत्पादकता अवघी 8 टन आहे. हे चित्र बदलण्यासाठी सविस्तर प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करा. त्याआधारे नागपूरी संत्र्याची उत्पादकता 75 टनापर्यंत पोचली पाहिजे. प्रक्रियेकामी स्वतंत्र वाण विकसीत करा परंतू नागपूरी संत्र्याची ओळख ही कायम टेबल फ्रुट अशीच असली पाहिजे. ब्राझील, युरोप मध्ये पाच हॉर्सपॉवरच्या पंपाचा वापर करुन हजारो लिटर ज्युस तयार होतो. त्यामुळे प्रक्रियेऐवजी टेबल फ्रुट म्हणून नागपूरी संत्र्याचे ब्रॅण्डींग झाले पाहिजे. नागपूरी संत्र्याची गोडी वाढविण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्या आधारे आंबट-गोड चव आणखी जीभेवर रुळणारी ठरेल.

आजकाल चांगल असण्यासोबतच चांगल दिसण ही महत्वाच आहे. त्यामुळे विदर्भाच्या संत्र्यांचा एक ब्रॅण्ड तयार करा. नागपूरी संत्रा असे नाव त्याला दया, मदर डेअरीसह खासगी कंपन्यांच्या माध्यमातून विक्रीकरीता प्रोत्साहीत करु पण त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून त्याचे प्रभावी ब्रॅण्डींग होणे गरजेचे आहे. राज्य, देश नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तो पोचेल, अशा पध्दतीची व्युव्हरचना नागपूरी संत्र्याच्या ब्रॅण्डींगसाठी आणली पाहिजे. संत्र बागांचे अस्तित्व टिकावे याकरीता दर्जेदार रोपांची उपलब्धता हवी. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 25 रोपवाटीका विकसीत करा. संत्र्यात ड्रोनने फवारणीचे प्रयोग झाले पाहिजे.

संत्रा पीकात तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादकता वाढीचे उद्देश साधणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागांना भेटीचा उपक्रम येत्या काळात राबविला जाणार आहे. त्याकरीता बॅटरीवर चालणारी विशेष बस उपलब्ध करुन दिली जाईल. ही सेवा मोफत असेल आणि तंत्रज्ञान प्रसाराचे उद्दिष्ट त्यातून साधले जाणार आहे. एकमेकांशी संवाद आणि चर्चेतूनच संत्रा दर्जा सुधार आणि उत्पादकता वाढीचा पल्ला गाठणे शक्‍य होईल.

- नितीन गडकरी, केंद्रिय मंत्री