
Nagpur : पारशिवनी नगरपंचायत झाली पण ;सहा वर्षांपासून अधिकाऱ्यांची प्रतिक्षाच
पारशिवनी : एखादी मागणी मंजूर झाली अथवा शासकीय काम पूर्ण झाले तर त्याचा ‘बाप’ होण्यासाठी अनेकजण पुढे येतात. पारशिवनी नगरपंचायतीचेही तसेच आहे. २०१६ शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी आजी-माजी नेत्यांमध्ये श्रेयवाद रंगला होता. पण नगरपंचायतचा दर्जा मिळून सहा वर्षे झाली तरी अनेक पदे रिक्त आहेत. सध्याचे कारभारीही पूर्णवेळ नाहीत.
पारशिवनीला नगरपंचायतचा दर्जा देण्याची मागणी ऑक्टोबर २०१६ मंजूर झाल्यानंतर राजकारण्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. त्याचे श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागली होती. नगरपंचायतीबरोबरच शहराच्या विकासासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेही आवश्यक होते. पण सहा वर्षे होऊनही प्रशासकीयदृष्ट्या महत्वाची असलेली अनेक पदे अजूनही रिक्त आहेत.
याचा परिणाम थेट विकासकामांवर होत आहे. ही पदे तत्काळ भरण्यात यावी, यासाठी आता कुणी आजी-माजी लोकप्रतिनीधी का पुढे येत नाहीत? असा प्रश्न पारशिवनीवासी विचारत आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील अथवा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, जनता हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र पक्के.
सुमारे २० हजार नागरिकांसाठी फक्त दोन दिवस
सध्या पारशिवनीचा अतिरिक्त कारभार रामटेक नगपंचायतच्या बांधकाम अधिकाऱ्याकडे दिला आहे. आठवड्यातून दोन दिवस पारशिवनीसाठी दिले जातात. शहरीकरण वाढत असल्याने बांधकाम परवानगीचे हजारो अर्ज येतात. केवळ दोन दिवसांत बांधकाम आणि त्यासंदर्भातील कामे पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे विकासकामे रेंगाळत असून नागरिकांनाही याचा फटका बसत आहेत.
पाणीपुरवठामहिन्यातून फक्त एक दिवस!
पाणीपुरवठा हा विभाग तसा बाराही महिने अलर्ट असावा लागतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था पाहणारा अभियंता महिन्यातून केवळ एकदा पारशिवनीला येतो. ही अतिरिक्त जबाबदारी सावनेर येथील स्वच्छता, पाणीपुरवठा अभियंत्याकडे आहे.