पोलीस कर्मचारी म्हणाला, तू जा तक्रार द्यायला दुपारी येजो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस कर्मचारी म्हणाला, तू जा तक्रार द्यायला दुपारी येजो!

पोलीस कर्मचारी म्हणाला, तू जा तक्रार द्यायला दुपारी येजो!

टाकळघाट (जि. नागपूर) : एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील टाकळघाट परिसरात चोरट्यांनी शेतीचे साहित्य टार्गेट केले असतांना आता शुक्रवार च्या रात्री दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारकर्ता आपल्या दुचाकी चोरीची तक्रार करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन ला सकाळी ८:०० वाजता च्या दरम्यान पोहचला असता स्टेशन डायरीवर कुणीही उपस्थित नव्हते तर एक महिला पोलीस बाजूच्या खोलीत झोपून असलेली आढळून आली. त्यांना दुचाकी चोरीची हकीकत सांगितली असता कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याची तक्रार न घेता 'तू आता जा तक्रार द्यायला दुपारी येजो' असे खडे बोल सुनावत त्याला हाकलून लावले या सर्व प्रकारामुळे एमआयडीसी पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टाकळघाट वार्ड क्र २ मधील चंद्रशेखर ज्ञानेश्वर पोहाने यांची दुचाकी क्र एमएच ४० आर ०६८८ शुक्रवार च्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी सकाळी चंद्रशेखर पोहाणे एमआयडीसी ठाण्यात गेले असता त्यांना कोणी नसल्याचा प्रकार दिसताच पोलीस गेले तरी कुठे असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. नंतर पुन्हा साडे नऊ च्या दरम्यान तक्रार देण्यास ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. परिसरात या अगोदर दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे त्याचाच तपास पोलिसांकडून अपूर्ण असतांना चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित बाबीकडे जातीने लक्ष देवून चोरीच्या प्रमाणावर आळा घालावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

सीसीटीव्ही चौकशी करावी---

माझी दुचाकी चोरी गेली तुम्ही तक्रार घ्या असा सवाल तक्रार कर्त्याने पोलीस कर्मचाऱ्याला केला असता तू आता जा तक्रार द्यायला दुपारी येजो' असे म्हणत त्याला हाकलून लावले. म्हणजे असे खडे बोल जर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांकडून ऐकू येत असेल तर सर्वसामान्य व्यक्ती तक्रार द्यायला तयार होत नाही. त्यामुळे सदर प्रकार घडला की नाही ,तक्रार देण्यास तक्रारकर्ता ठाण्यात आला की नाही ,पोलीस कर्मचारी त्यावेळी उपस्थित होते की नाही या सर्व बाबीसाठी वरिष्ठांनी जर पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही तपासले असता या सर्व प्रकाराची माहिती मिळेल.या सर्व बाबीकडे विशेष पोलीस महानिरीक्षक ,ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष देणार की पोलीस पोलिसांची मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतीसाहित्य नंतर दुचाकी टार्गेट--

मागील दोन तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या उपयोगी असणारे मोटरपप,केबल,वायर ,फास,सब्बल,ड्रम,नांगर आदी साहित्य शेतातून चोरट्याने चोरून नेले त्यासंदर्भात माधव बावणे,सूर्यकांत पजाइ यांनी तक्रार केल्या.बहुतेक शेतकऱ्याने साहित्य चोरी गेल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या नाही.तरी सुद्धा पोलिसांना चोरटे पकडण्यात यश आले नाही.अशा या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांत दहशत पसरली असून भीतीचे वातावरण तयार होत असून पोलिसांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

असे प्रकार नित्याचे,पत्रकारांनाही माहिती पुरविण्यास होते टाळाटाळ

सद्राक्षणाय,खलनिग्रहनाय असे ब्रीद वाक्याखाली पोलीस विभाग कार्य करतो.परंतु एम आय डी सी पोलीस स्टेशन ला फिर्यादीची तक्रार नोंदवायला तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या गुन्ह्याची,गुन्हयातील आरोपींची,चोरीतील मुद्देमालाची माहिती देण्यास पोलीस कर्मचारी व स्टेशन डायरी अंमलदार नेहमीच टाळाटाळ करीत असतो.हेच काय तर तपासी अंमलदार व वरिष्ठ अधिकारी सुद्धा माहिती देत नसून वेळ मारून नेत असल्याचा प्रकार नेहमीचाच आहे.

loading image
go to top