पोलिसांनी 'राजकीय दबावाला' बळी पडू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inauguration of Police Building

पोलिसांनी 'राजकीय दबावाला' बळी पडू नये

नागपूर : देशात महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे कर्तव्य पार पाडत असताना सत्ताधारी अथवा विरोधकांच्या राजकीय दबावाला बळी पडू नका. गुन्ह्याच्या तपासाचे काम निःष्पक्षपणे पार पाडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सिव्हिल लाइन्स येथील पोलिस भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

पोलिस आयुक्तालयाद्वारे सिव्हिल लाइन्स येथील भव्य अशा पोलिस भवनाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक विवेक फणसाळकर, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस अधीक्षक विजय मगर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पोलिसांच्या कल्याणासाठी आघाडी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही. यासाठी जवळपास १ हजार कोटीची तरतूद करण्याचा आमचा मानस आहे. केवळ इतकेच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीमधूनही प्रत्येक पालकमंत्री दोन ते दहा कोटींपर्यंत निधी देतो आहे. त्यातून अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यात आहे. कार्यक्रमात इतवारी परिसरातील सराफा ओळीतील दरोड्याचा २७ तासात तपास करून आरोपींना अटक केल्यानंतर त्यातील जप्त केलेले साडेचार किलो सोने, अडीच किलो चांदी असा ३ कोटींचा मुद्देमाल व्यापाऱ्याला परत करण्यात आला. यावेळी सराफा ओळीतील व्यापाऱ्यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलिस आयुक्तांचा सत्कार केला. संचालन पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांनी केले.

आमची सारखी परीक्षा घेऊ नका

सराफा व्यापाऱ्यांचे सोने परत केल्यानंतर त्यांना घरापर्यंत जाण्यासाठीही सुरक्षा द्या, नाहीतर पुन्हा चोरी व्हायची, असे वक्तव्य पवार यांनी करताच एकच हशा पिकला. दुकानात नोकर नेमताना पोलिस वेरिफिकेशन करा, सीसीटीव्ही कॅमेरा लावा, जबाबदार नागरिक म्हणून वागा, अशा शब्दात व्यापाऱ्यांचे कान टोचत, आमची सारखी सारखी परीक्षा घेऊ नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

अंमली पदार्थांविरुद्ध झिरो टॉलरन्स - दिलीप वळसे पाटील

अंमली पदार्थांमुळे देशातील तरुण पिढी वाया जाते आहे. त्यामुळे पोलिसांनी अंमली पदार्थ व त्या व्यवसायातील गुन्हेगारांप्रती झिरो टॉलरन्स बाळगावा, असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला. तसेच काही घटक राज्यात सामुदायिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, राज्य पोलिस दल सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Nagpur Police Political Pressure Deputy Chief Minister Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top