esakal | Nagpur: मायबाप सरकार आमचे ऐकणार का? अडचणींमुळे नागरिक त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त

नागपूर : मायबाप सरकार आमचे ऐकणार का? अडचणींमुळे नागरिक त्रस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पश्चिम मतदारसंघातील अनेक भागांमध्ये घाण, दूषित पाणी व कचऱ्याच्या समस्येसह वाढत्या महागाईने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. दिवसेंदिवस शहरात साथीचे आजार वाढत आहेत. मात्र त्यांच्या अडचणी समजून घेणारे कुणीही नाहीत. सरकार व मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

दर महिन्यात हजाराचे सिलेंडर भरायचे कुठून?

उज्ज्वला योजनेतून गोरगरिबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे खेड्यापाड्यापर्यंत उज्ज्वला योजना पोहोचली. मात्र, सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत चालल्याने माझ्यासारख्या गृहिणींना मनस्ताप होतो. दर महिन्याला एक हजाराचे सिलिंडर कुठून भरायचे. आधीच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारीमुळे आर्थिक अडचणी वाढल्या. त्यात महागाईने आणखीनच कंबरडे मोडले. दोनवेळचे खाण्याचे वांधे आहेत. अशा परिस्थितीत गरिबांनी जगायचे कसे? सरकारने याबाबत विचार करावा, असे मला वाटते.

-प्रतिमा थोरात, गिट्टीखदान

पाऊस आला की नळाला दूषित पाणी

आम्ही गेल्या दहा-बारा वर्षांपासून गोधनी भागात राहतो. मात्र इथे पिण्याच्या पाण्याची खूपच समस्या आहे. उन्हाळ्यातच नव्हे, भर पावसातही अडचण जाते. नियमित नळ येत नसल्याने नाइलाजाने तहान भागविण्यासाठी मुलाबळांसह एक किमी दूर शहरातील नळाकडे धाव घ्यावी लागते. शिवाय पाऊस आला की दूषित पाणी येते. त्यामुळे आजारांची भीती वाढते. अशावेळी उकळून पाणी प्यावे लागते. नियमित स्वच्छ पाणी मिळावे, ही मागणी व अपेक्षा आहे.

-मनीषा पराते, राजेश्वरनगर

अर्धा तासाच्या पावसात घरासमोर तलाव

झिंगाबाई टाकळीतील अनेक वस्त्यांमध्ये जागोजागी छोटे-मोठे सिमेंट रोड बांधण्यात आले आहेत. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आमच्या कोहळे ले-आऊटमध्ये अर्धा तास जोराचा पाऊस आला तरीदेखील तलाव साचतो. तुंबलेले पाणी अनेकांच्या घरांमध्ये व वाहनांमध्ये घुसते. पाण्यामुळे डासांचा हैदोस वाढला असून, ताप व मलेरियाचे आजार वाढले आहेत.

-चंद्रसेन तेलमोरे, झिंगाबाई टाकळी

घाण, कचऱ्यामुळे आजारांची भीती

आमच्या भागात रिकाम्या भूखंडांमुळे घाण व कचरा खूप वाढला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. मनपाच्या गाड्या नियमित येत नाहीत. त्यामुळे सतत कचरा साचला राहतो. शिवाय जागोजागी पाण्याचे डबकेही साचते. सध्या डेंगीची साथ सुरू असल्यामुळे खूप भीती वाटते. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. आमच्या घरात लहान मुले आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे नियमित फवारणी व स्वच्छता करणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने ते होत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-सोनू भोयर, गोकुलधाम सोसायटी

दूषित पाणी व रस्त्याची दुहेरी समस्या

आशीर्वादनगरमध्ये दूषित पाणी व रस्त्याची खूप मोठी समस्या आहे. या दुहेरी समस्येमुळे सध्या सर्व जण त्रस्त आहेत. जागोजागी दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे मलेरिया, कावीळ व डायरियासह विविध साथीच्या आजाराला पोषक वातावरण मिळत आहे. डेंगीचाही प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. समस्या गंभीर असूनही मनपा प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. नियमित फवारणीसह स्वच्छ पाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे.

-वंदना पावडे, आशीर्वादनगर

loading image
go to top