esakal | Nagpur : विद्यापीठातील संशोधनाला प्राधान्य
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : विद्यापीठातील संशोधनाला प्राधान्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरच्या मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला श‍िरीष चक्रदेव यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त कुलगुरू डॉ. चक्रदेव यांनी विद्यापीठातील संशोधनावर ‘फोकस’ राहील असे सांगत त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, विकास आणि व्याप्ती वाढविण्यावर भर देण्याचा मनोदय ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीएनआयटी येथून वास्तुविद्याशास्त्र पदवी प्राप्त केली. त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम.टेक. तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.

अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकूण ३६ वर्षांचा अनुभव त्यांना आहे. या अनुभवाचा वापर विद्यापीठाच्या विकासासाठी करण्याचा मानस डॉ. चक्रदेव यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, संशोधनामागे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन असून चालत नाही तर त्याला कला, शास्त्र आणि इतर विषयांची जोड असावी लागते. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. विद्यापीठात चांगले संशोधन होते. त्याचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न राहील.

याशिवाय विद्यापीठाकडे चांगले अभ्यासक्रमही आहेत. तसेच आधीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी चांगले उपक्रम राबविले आहेत. त्या उपक्रमांना समोर घेऊन जायचे आहे. अभ्यासक्रमांना कौशल्य विकासाची जोड देत, त्यांना अधिक चांगले कसे करता येईल यावर भर देण्याचा प्रयत्न राहील. याशिवाय इंटिग्रेडेट अभ्यासक्रमांची सुरवात करण्यावरही भर राहील, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top