Nagpur : जन्मठेपेच्या आरोपातून प्रा.साईबाबा निर्दोष मुक्त

गडचिरोली सत्र न्यायालयाने सुनावणी होती जन्मठेप;इतर पाच जणांनाही दिलासा
Court
Court Sakal

नागपूर : माओवादी असल्याच्या आरोपात शिक्षा भोगत असलेले जेएनयुचे प्रा. जी. एन. साईबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांना मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गेल्या पाच वर्षांपासून ते कारागृहात शिक्षा भोगत होते. मात्र, बेकायदा प्रतिबंधक हालचाली (प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींचे पालन न झाल्याचे निरीक्षण नोंदवीत नागपूर खंडपीठाने सत्र न्यायालयाचा शिक्षेचा निर्णय रद्द ठरवीत आरोपींची सुटका केली आहे.

या प्रकरणी न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने २०१७ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर गेल्या महिन्यात सुनावणी सुरू झाली. पोलिस तपासात अनेक चुका असून त्यांद्वारे असे लक्षात येते की, साईबाबाला व सर्वच आरोपींना अवैधरीत्या अटक करण्यात आली आहे आणि त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद आरोपींतर्फे करण्यात आला होता. मात्र, सरकारी पक्षाने आपल्या युक्तिवादात याला विरोध केला.

सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे सबळ असून गुन्हेगारांची शिक्षा कायम ठेवण्यात यावी, अशी विनंती शासनातर्फे न्यायालयाला करण्यात आली होती. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून वरिष्ठ अधिवक्ता सिद्धांत दवे यांनी बाजू मांडली. बचावपक्षाकडून वरिष्ठ अधिवक्ता ॲड. सुबोध धर्माधिकारी, ॲड. प्रदीप मानध्यान यांनी बाजू मांडली तर ॲड. निहालसिंह राठोड आणि ॲड. बिपिन कुमार यांनी त्यांना सहकार्य केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी सुनावण्यात आला.

बॉक्स

निर्दोष मुक्त झालेले आरोपी

या प्रकरणी युएपीए कायद्याच्या कलम ४५ (१) अंतर्गत असलेल्या तरतुदींचे पालन झाले नाही. त्यामुळे, या कायद्या अंतर्गत केलेल्या कारवाईला देण्यात आलेली मंजुरी न्यायालयाने अवैध ठरविली. परिणामत: गडचिरोली सत्र न्यायालयापुढे चालविण्यात आलेला खटला व त्यात सुनावण्यात आलेला निर्णयसुद्धा रद्दबातल ठरविण्यात येत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

प्रा. गोकराकोंडा नागा साईबाबा (वय ४७, रा. वसंत विहार, दिल्ली), महेश करीमन तिरकी (वय २२, रा. मुरेवाडा, ता. ऐटापल्ली, जि. गडचिरोली), पांडू पोरा नरोटे (वय २७, रा. मुरेवाडा, ता. ऐटापल्ली, जि. गडचिरोली), हेम केशवदत्त मिश्रा (वय ३२, रा. कुंजबरगल, अलमोडा, उत्तराखंड), प्रशांत राही नारायण सांगलीकर (वय ५४, रा. देहरादून, उत्तराखंड) आणि विजय नान तिरकी (वय ३०, रा. कानकेर, छत्तीसगढ) यांच्या नावाचा समावेश आहे. उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना आरोपी पांडू नरोटे याचा कैदेत असताना आजारी पडून अलीकडेच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com