
नागपूर : रेल्वेच्या गोदामाला आग
नागपूर : मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील पार्सलच्या गोदामाला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आग लागली. प्रशासनाच्या सतर्कतेने इतरत्र पसरणारी आग त्वरित आटोक्यात आणल्याने मोठी होणारी घटना टळली.
फ्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील पार्सल ऑफिसच्या बाजूला गोडाऊन जवळ अचानक आग लागली. येथे संत्रा मार्केटच्या दिशेने पार्सल कार्यालय आहे. या कार्यालयात मालाची आवक जावक असते. तसेच माल चढविणारे आणि उतरविणारे कामगार नेहमीच असतात. याच धावपळीत सायंकाळच्या सुमारास मालगोदामाला अचानक आग लागली. किरकोळ आग असली तरी वाढत्या तापमानात आग वाढत जाण्याची शक्यता होती. परंतु, रेल्वे प्रशासन आणि उपस्थित कामगारांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान सादिक, नावाच्या एका व्यक्तीने अग्निशमन कार्यालयाला सूचना दिली. क्षणाचाही विलंब न करता पाण्याचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. पाण्याचा मारा करून आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळविले. दरम्यान मालगोदामातील पोती आणि एक जुनी अॅक्टीव्हा जळाली. जवळपास १० हजारांचे नुकसान झाले. रेल्वेची शंभर टक्के बचत झाली, अशी माहिती अग्निशमन कार्यालयाने दिली.
सिगारेटमुळे कचऱ्यातून आग पसरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याबाबत खुलासा होऊ शकला नाही. नागपूर मध्यवर्ती स्थानकावर दरदिवशी हजाराच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. आग जर इतर ठिकाणी पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आल्याने प्रवासी व प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.
Web Title: Nagpur Railway Parcel Warehouse On Fire
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..