Nagpur : राजेश्वरीचा राजधानीत डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : राजेश्वरीचा राजधानीत डंका

नागपूर : ‘इच्छा तिथे मार्ग’ ही म्हण कोराडीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या राजेश्वरी पाटीलच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते. जिद्द, जबर इच्छाशक्ती आणि समर्पणभावनेच्या जोरावर राजेश्वरीने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या एका प्रतिष्ठित फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश मिळवून आपल्या गावासह नागपूर व विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

१६ वर्षीय राजेश्वरीचा दिल्लीपर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. दहा बाय दहाच्या एका छोट्याशा झोपडीत राहणारी राजेश्वरीच्या जेमतेम दहा वर्षांची असताना तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

त्यामुळे आईने बांधकाम साईटवर तीनशे रुपये रोजमजुरीने गोट्यामातीचे काम करत मुलीला लहानाचे मोठे केले. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना अचानक कोरोना आला आणि संसाराची धावती गाडी विस्कळीत झाली. हलाखीच्या परिस्थितीमुळे राजेश्वरीला शिक्षणसुद्धा सोडावे लागले. अशावेळी झोपडपट्टी फुटबॉलचा आधार मिळाला. राशन-पाण्यासोबतच तिचे थांबलेले शिक्षणही पूर्ववत सुरू झाले.

फुटबॉलची आवड असल्यामुळे राजेश्वरी सर्व काही विसरून हळूहळू मैदानावर जाऊ लागली. कठोर परिश्रमाच्या जोरावर अल्पावधीतच स्लम सॉकरतर्फे संचालित एचसीएल फाऊंडेशनच्या शक्ती गर्ल्स प्रोग्रामअंतर्गत तिची निवड झाली. लगेच बंगळुर येथील हिवाळी शिबिरात संधी मिळाली. यात राजेश्वरीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. तिची मेहनत फळाला आली. डिसेंबर २०२१ मध्ये मुलींचा व्यावसायिक क्लब सुदेवा दिल्ली फुटबॉल क्लबकडून राजेश्वरीला फोन आला. त्यामुळे आता लवकरच कामठीची राजेश्वरी आय लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. स्मिता पाटील शाळेची विद्यार्थिनी असलेल्या राजेश्वरीने आतापर्यंत राज्य शालेय स्पर्धांसह विविध स्पर्धा गाजवून पुरस्कार व ट्रॉफीज जिंकल्या आहेत. राजेश्वरीमधील जिद्द व गुणवत्ता लक्षात घेता भविष्यात नक्कीच ती आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये देशाला नावलौकिक मिळवून देईल, यात तिळमात्र शंका नाही. तेच आपले अंतिम ध्येय असल्याचे राजेश्वरीनेही सांगितले.

भारतातील महिला खेळाडूंना क्रीडा आणि शिक्षण या दोहोंमध्ये ताळमेळ साधताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा शिक्षणामुळे खेळाकडे दुर्लक्ष होऊन, मुलींना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे. मी खेळातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

-राजेश्वरी पाटील,महिला फुटबॉलपटू