
Nagpur : रामनवमी शोभायात्रेवर पावसाचे सावट
नागपूर : शहरात तीन दिवसांनी येणाऱ्या रामनवमीच्या शोभायात्रेवरही पावसाचे सावट असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. तसे संकेत रविवारी काही आलेल्या जोरदार पावसाच्या सरींनी दिलेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाने नियमित हजेरी लावली होती. बुधवार (ता.२९) आणि गुरुवार (ता.३०) पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तब्बल तीन वर्ष कोरोनाच्या प्रतिबंधामुळे पोद्दारेश्वर राममंदिरातील शंभर वर्षे जुनी रामनवमीची शोभायात्रा काढण्यात आली होती.
तीन वर्षाच्या विलंबानंतर आता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच पश्चिम नागपुरातील रामनगर येथून निघणाऱ्या रॅलीचीही जय्यत तयारी झालेली आहे. मात्र, हवामान खात्याचा इशारा त्यांच्या उत्साहावर विरजण पाडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने रविवारी दुपारी उपराजधानीला चांगलाच दणका दिला. जवळपास अर्धा ते पाऊण तास शहरातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह बरसलेल्या जोरदार पावसाने नागपूरकरांची त्रेधातिरपीट उडविली. रविवारी शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. सोमवार आणि मंगळवारी किमान तापमान कमी राहण्याची शक्यता असून कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढू शकते.
दुपारपर्यंत ऊन तापल्यानंतर एकच्या सुमारास पश्चिम नागपुरातील अमरावती रोड, दाभा, हजारीपहाड, मानकापूर, काटोल रोडसह अनेक भागांमध्ये विजा व मेघगर्जनेसह दमदार पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला.
सखल भागांमध्ये डबके साचले. रस्त्यावरूनही लोट वाहिले. ''वेस्टर्न डिस्टर्बन्स''मुळे विदर्भात पाऊस व ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. येत्या २९ व ३० मार्चलाही विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.