
फुकटची 'हजामत' झाली महाग!
नागपूर : कोरोनाच्या महामारीनंतर आलेल्या महागाईमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. या महागाईची तीव्रता आणखीच जाणवू लागली असताना नागपूरकरांना आता केस कटिंगसाठी देखील २५ ते ५० टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. तसेच आतापर्यंत फुकटात करून मिळणाऱ्या ‘बगल’ साफसफाईसाठीही पन्नास रूपये मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हातर्फे आयोजित विदर्भस्तरीय मेळाव्यात शहरातील कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरु झाली आहे.
कोरोनाच्या काळातही या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली होती. त्यातून सावरत असताना आता इंधनासह कारागिरांचा पगार, कटिंग, दाढीच्या सर्वच साहित्यांच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सध्याच्या दरात कटिंग करणे परवडत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. तेव्हा सर्वच सदस्यांनी भाववाढ करण्याबाबत चर्चा झाली. महामंडळाने दरवाढ करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार केस किर्तनालय दुकानदार संघ नागपूर यांनी नवीन दरवाढीचे पत्रकही काढले आहे. या दरवाढीच्या निर्णयावर सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

प्रथमच बगल (अंडर आर्म) मधील केस काढण्यासाठी पूर्वी वेगळे शुल्क आकारण्यात येत नव्हते. पूर्वी दाढीसाठी वापरण्यात येणारा ब्लेडच सर्वसाधारपणे बगल स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत होता. आता त्यासाठी ‘युज ॲण्ड थ्रो‘ ब्लेड वापरण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचे वेगळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल २० ते ५० रुपये आकारण्यात येणार आहे.
- राजेंद्र फुलबांधे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा
Web Title: Nagpur Salon Hair Cuting Cost 25 To 50 Percent Increase
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..