नागपूर : आनंदाच्या भरात केला हवेत गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shooting Crime

नागपूर : आनंदाच्या भरात केला हवेत गोळीबार

नागपूर : पोलिस कारवाईपासून वाचल्यानंतर चौघे रस्त्याच्या कडेला कार उभी करून गाण्यावर नाचत होते. त्यातील एकाने आनंदाच्या भरात जवळ असलेल्या रिवॉल्वरमधून दोन राउंड हवेत फायर केले. गोळ्यांच्या आवाज आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सूचना मिळताच पोलिसांनी पाठलाग करून कारने पळण्याच्या बेतात असलेल्या चौघांना अटक केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उत्कर्षनगर टर्निंग, ग्रीन व्हीव अपार्टमेंट समोर गुरुवारी रात्री १० ते १.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आलोक अरुणकुमार शुक्ला (३९) रा. अशोक नगर अकोला, दीपक विद्यासागर चौधरी (४५) रा. केटीनगर, राजू लक्ष्मण कडू (४३) रा. हजारी पहाड आणि कार्तिकेय नरेंद्र दशसहस्र (३१) रा. गणेशपेठ अशी आरोपींची नावे आहेत.

आलोक आणि कार्तिकेय यांचा रेती ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी मौदा पोलिसांनी आलोकचा रेतीने भरलेला ट्रक जप्त केला होता. कार्तिकेयने उच्च न्यायालयात वकीली करीत असलेले राजू कडू यांच्याशी आलोकची ओळख करून दिली. पोलिसांच्या कारवाईवर तोडगा काढत कडू यांनी आलोकच्या ट्रकची सुटका करून दिली. ट्रकची सुटका झाल्याचा आनंद साजरा करण्याचे ठरविले. त्यामुळे चौघेही आलोकच्या कारने कळमेश्वर मार्गावरील ढाब्यावर जात होते. दरम्यान, कारमध्ये त्यांचे खाणेपिणेही सुरूच होते.

आलोकच्या कारमध्ये परवाना असलेले त्याचे रिव्हॉल्व्हरही होते. चौघेही उत्कर्षनगर चौकात आल्यावर त्यांनी कार तिथे उभी केली आणि नाच-गाणे सुरू केले. अतिउत्साहात आलोकने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली.

नियंत्रण कक्षाला याची सूचना देण्यात आली. सूचना मिळताच गिट्टीखदान पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत आरोपी निघून गेले होते. परिसरातील लोकांनी काळ्या रंगाची एसयूव्ही कार गोरेवाड्याकडे जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तत्काळ गोरेवाड्यापर्यंत पाठलाग केला. मात्र अशी एकही गाडी दिसली नाही.

नाकाबंदी, पाठलाग करून अडविली कार

पोलिसांनी संपूर्ण परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान काळ्या रंगाची व विशिष्ट क्रमांक असलेली काळ्या रंगाची एसयूव्ही कार हजारीपहाड येथे येताना दिसली. पाठलाग करून गाडी थांबवण्यात आली. चारही आरोपी कारमध्ये होते. गोळीबारात वापरलेले रिव्हॉल्व्हरही झडतीत सापडले. चौघांना अटक करून रिव्हॉल्व्हर आणि कार जप्त करण्यात आली.

Web Title: Nagpur Shooting Illegal Gun Crime Gittikhadan Incident Four Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..