
नागपूर : दहा रुपयांच्या नाश्त्यावर रक्तदात्यांची बोळवण
नागपूर - रक्तदानाची चळवळ ही स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांच्या भरवशावर उभी झाली. अशा रक्तदात्यांची संख्या वाढली खरी पण रक्तदान करणाऱ्यांची १० रुपयांच्या नाश्त्यावर बोळवण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नाश्त्यासाठी २५ रुपये खर्च करावे असे आदेश आहेत.
नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून(नॅको) स्वेच्छिक रक्तदात्यांसाठी दरवर्षी सुमारे पन्नास ते साठ कोटी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदानावर खर्च करण्यात येतो. हा निधी अधिकृत रक्तपेढयांना मिळतो. रक्तपेढयांकडून रक्तदात्यांच्या नाश्त्यावर २५ रुपये खर्च करावा, असे शासनाच्या आदेशात नमुद आहे. तर १५ रुपये रक्तदान शिबिराच्या आयोजनावर खर्च करण्यात येतात. परंतु, शासकीय रुग्णालयांतील रक्तदात्यांना देण्यात येणाऱ्या नाश्त्यावर १० रुपयेदेखील खर्च होत नाहीत. राज्यात ३०० वर रक्तपेढया आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये दरवर्षी सुमारे १४ लाखांवर रक्तयुनिट गोळा होतात. या रक्तदात्यांच्या नाश्त्यावर सुमारे ३५ ते ४० कोटीचा निधी खर्च होतो.
१५ कोटींवर निधी शिबिराच्या आयोजनादरम्यान रक्तदात्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र, बॅचेस, स्मृतिचिन्ह, वाहतूक खर्च, बॅनरवर खर्च केला जातो. नि:स्वार्थ भावनेने रक्तदान करण्यासाठी निधीची गरज पडते. अशावेळी जो रक्तदान करतो किंवा करण्यास सक्षम आहे तो रक्तदाता रक्तदान केल्यानंतरही आनंदी राहावा; पुढील तीन महिन्यानंतर त्या रक्तदात्यामध्ये रक्तदान करण्याची भावना जागृत असणे ही काळाची खरी गरज आहे. स्वेच्छेने होणाऱ्या रक्तदानावर रक्तदान चळवळ जीवंत राहणार आहे. दुर्देवाने नाश्त्यावर २५ रुपये खर्च मिळत असताना १० रुपयात हाफ चहा आणि बिस्किट देवून रक्तदात्याची बोळवण केली जाते.
रक्त संक्रमण परिषदेकडून चार वर्षांपासून निधी नाही
उपराजधानीत मेडिकल, मेयो आणि डागा या तीन शासकीय रक्तपेढ्यांमध्ये आहेत. येथे २५ हजार युनिट रक्त गोळा होते. या रक्तपेढ्यांना वर्षाला किमान सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचा निधी मिळणे अपेक्षित असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून पूर्ण निधी मिळत नाही. यावर कळस म्हणजे मागील चार वर्षांपासून राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून डागा, मेडिकल, मेयोला निधीच मिळाला नाही.
रक्तदाता सुदृढ असावा लागतो. स्वेच्छेने होणारे रक्तदान, हाच सुरक्षित रक्त व रक्तघटकांचा मुख्य स्रोत आहे. हा स्त्रोत कायम राहावा म्हणून रक्तदाता आनंदी ठेवणे हे रक्तसंक्रमण परिषदेचे तसेच स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. केवळ १० रुपये नाश्त्यावर खर्च करणे रक्तदात्यांची थट्टा आहे.
-अनिकेत कुत्तरमारे,अध्यक्ष- प्रीर्यदर्शी सम्राट अशोक बहुद्देशीय संस्था,नागपूर.
Web Title: Nagpur Sickle Cell Society Objection Government Blood Donation Banks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..