Nagpur तणावामुळे पोलिसांना होतेय बीपी, शुगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nagpur

नागपूर : सातत्याने जनतेच्या सुरक्षेत जुंपलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना १२ तास ऑनड्युटी राहावे लागते. सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे, शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो. हा तणाव, वेळीअवेळी जेवण, पुरेशी झोप नसणे, यामुळे पोलिसांमध्ये लठ्ठपणा व सोबत उच्च रक्तदाब, मधुमेह या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. शहरातील हजारावर पोलिसांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची लागण झाल्याची माहिती समोर येत असून जनतेची सुरक्षा करणारे पोलिस स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र असुरक्षित आहेत.

Nagpur : तणावामुळे पोलिसांना होतेय बीपी, शुगर

कोरोना काळापासून पोलिसांच्या कामाचा ताणात वाढ झालेली आहे. कोरोना संपताच प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्याची स्पर्धाच जणू सुरू झाली आहे. या सणांना गालबोट लागू नये यासाठी पोलिसांवर अधिकच जबाबदारी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवापासून नवरात्र, दसरा, दिवाळी, डिसेंबरमध्ये होणारे अधिवेशन आणि त्यानंतरही इतर सणांच्या बंदोबस्तासाठी ते तयार आहेत. अशावेळी त्यांच्या रद्द होणाऱ्या सुट्या यामुळे त्यांच्यावरील मानसिक ताण वाढत आहे.

या मानसिक ताणामुळेच गेल्या वर्षभरात शहरातील पोलिसांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या आजारांनी ग्रासले आहेत. पोलिसांसाठी गेल्या काही वर्षांपासून काही संस्थांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. या तपासणीत शरीरात व्हिटॅमिन्सचा अभाव, लोहाची कमतरता, चेहरा- हातापाय यांवर सूज, पोटाचे विकार, दम लागणे अशा तक्रारी अधिक प्रमात दिसून आल्या आहेत. हे चित्र विदारक असून येत्या काळात ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निराशेने मन हिंसेकडे वळू शकते बंदोबस्ताच्या काळात पोलिसांचा दिवसेंदिवस कुटुंबासोबत भेट होत नाही, या तुटलेपणाचा ताण अधिक येतो, असे एका माजी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही सकारात्मक नाही. त्यामुळे समाजात आणि अंतर्गत व्यवस्थेमध्ये मिळणारी वागणूक पोलिसांना नैराश्यग्रस्त करते. त्यामुळे स्वतःला इजा करू घेण्याची शक्यता पोलिसांमध्ये बळावू शकते, असे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात.