
नागपूर : अंबाझरी तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
नागपूर - पेपर सोडविल्यानंतर घरी न जाता मित्रांसोबत फिरावयास गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थाचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. कुणाल राजकुमार बर्वे (वय १९, रा.अमरनगर, एमआयडीसी) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. कुणाल मुंडले महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. आज सोमवारी दुपारी पेपर संपल्यावर तो आपल्या मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ आला. त्याचे मित्र पोहण्यासाठी उतरले.
त्यांच्यासोबत कुणालही तलावात उतरला. मात्र, काही वेळातच तो बुडायला लागला. तो बुडण्याचा अभिनय करीत असल्याचे मित्रांना वाटले पण काही क्षणात तो दिसेनासा झाल्याने मित्र घाबरले. त्यांनी बाहेर येत आरडाओरड सुरू केली.
मात्र, तोपर्यंत कुणाल पूर्णपणे बुडाला होता. आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे एकत्र झाले. त्यांनी अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने कुणालचा मृतदेह बाहेर काढला.
स्टंटबाजी अंगावर
कुणालचा आज द्वितीय सत्राचा पेपर होता. पेपरनंतर दुपारी वेळ असल्याने तो अंबाझरी तलाव परिसरात मित्रासह फिरायला गेला. यावेळी पोहण्याची इच्छा झाल्याने त्याने मित्रासह तलावात उडी घेतली. पोहत असताना त्याने मित्रांसोबत स्टन्ट केल्याची माहिती समोर आली. स्टंटबाजी केल्यानेच जीव गेल्याची चर्चा आहे.