
Nagpur University : नागपूर विद्यापीठ परीक्षेवर कशी ठेवणार नजर?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ५ डिसेंबरपासून सुरू होत आहेत. यावेळी महाविद्यालयस्तरावर लेखी आणि तीन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वीच्या परीक्षादरम्यान घडलेल्या घटनेचा पूर्वानुभव लक्षात घेता, यंदा विद्यापीठ या परीक्षेवर कसे लक्ष ठेवणार? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांवर टाकण्यात आल्याचे दिसून येते.
हिवाळी परीक्षेत विद्यापीठाने महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी सोपवली. महाविद्यालयांना सर्व बीए, बीकॉम, बीएसस्सी, बीबीए आणि इतर गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एक ते तीन सेमिस्टरच्या परीक्षा द्यायच्या आहेत. यावेळी महाविद्यालयांची जबाबदारी वाढवत विद्यापीठाने त्यांना प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारीही दिली. एमसीक्यू पॅटर्न बंद करण्यात आला असून, महाविद्यालयांना ही परीक्षा ‘अॅनालिटिकल पॅटर्न’वर द्यावी लागणार आहे. महाविद्यालयातील शिक्षकांना सर्वच पेपरचे मूल्यांकन करून सर्व रेकॉर्ड विद्यापीठाकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या सर्व परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकूनपरीक्षा पद्धतीच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतीच बीएसस्सी फिजिक्सची प्रश्नपत्रिका शिक्षकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी विद्यापीठाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा स्थितीत महाविद्यालयीन स्तरावरच प्रश्नपत्रिका तयार होत असतील, तर त्यांच्या गोपनीयतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन काय करणार, हेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कटू अनुभव
विशेष म्हणजे गेल्या उन्हाळी परीक्षा सत्रात नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातच परीक्षा केंद्र दिले होते. त्यातच परीक्षेचा बोजवारा उडाला होता. त्यातून विद्यापीठाला अनेक महाविद्यालयातील पेपर रद्द करावे लागले. तसेच अनेक परीक्षा केंद्रच रद्द करण्याची नामुष्की ओढविली होती. त्यामुळे यापूर्वीचे कटू अनुभव आल्यावरही विद्यापीठाने महाविद्यालयांची जबाबदारी वाढविल्याचे चित्र दिसून येते. या प्रकाराने शिक्षणविश्वातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परीक्षा प्रणाली ढेपाळली
प्रत्यक्षात नागपूर विद्यापीठातील एमकेसीएल कंपनीच्या वादामुळे परीक्षा व्यवस्था हादरली आहे. एमकेसीएल कंपनीकडे प्रथम वर्षाची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र, अचानक बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने परीक्षेचा भार पेलण्याच्या स्थितीत विद्यापीठ नाही. त्यातूनच या परीक्षांचा बोझा महाविद्यालयांवर टाकण्यात आला असल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे.