नागपूर : कन्हानमध्ये फ्लाय ॲश, शहराचा पाणीपुरवठा बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply

नागपूर : कन्हानमध्ये फ्लाय ॲश, शहराचा पाणीपुरवठा बाधित

नागपूर : खापरखेडा येथील फ्लायॲश कन्हान नदीत सोडण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उद्या, सोमवारी नेहरूनगर, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही.

गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या कच्च्या पाण्याच्या विहिरीजवळ पूरपरिस्थिती होती. दरम्यान रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास कच्च्या पाण्याच्या विहिरीजवळ नदीत फ्लाय ॲश आढळली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कन्हान नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील दोन्ही विहिरींवरील पंप बंद करण्यात आले.

प्रक्रियेसाठी पाणी उपसणे बंद झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून रविवारी नेहरूनगर, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा झाला नाही. सायंकाळपर्यंत पाण्यात फ्लाय ॲश दिसून येत असल्याने पुढील ४८ तासांसाठी जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उद्याही या चार झोनमधील लाखो घरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. चार झोन अर्थात ४० टक्के शहरवासी उद्या पाण्यापासून वंचित राहणार आहे.

आदित्य ठाकरेंचे पद जाताच फ्लाय ॲश नदीत

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील फ्लाय ॲशमुळे नंदगाववासी त्रस्त होते. येथील नागरिकांची दखल घेत फेब्रुवारीमध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नंदगावला भेट दिली. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे आदेश दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने खापरखेडा औष्णिक केंद्राचे कान टोचले होते. त्यामुळे समस्या सुटली होती. परंतु आदित्य ठाकरे यांचे पद जाताच फ्लॉय ॲशबाबत पुन्हा बेजबाबदारीपणा दिसून येत आहे.

Web Title: Nagpur Water Supply Disrupted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..