
Nagpur Winter Session : दहा हजार कोटींची उलाढाल शक्य
नागपूर : नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेतले जाते. त्यात विदर्भातील किती प्रश्न सुटतात हे न सुटणारे कोडे असले तरी शहरातील लहानात लहान व्यावसायिकांपासून ते हॉटेल चालकांसाठी व्यापार करण्याची ही चांगली पर्वणी असते. अधिवेशनाच्या काळात शहरात यंदा अंदाजे दहा हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर आणि विदर्भात होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल कोरोना काळात अधिवेशन रद्द झाल्याने ठप्प झाली. सलग दोन वर्षे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले. अधिवेशनासाठी आमदार निवास, मंत्र्यांचे निवासस्थान रविभवनासह इतरही पायाभूत सुविधांची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाच्या निविदा निघाल्या असून कामेही सुरु झालेली आहेत. यात रंगरंगोटी करणाऱ्या छोट्या-मोठ्या कंत्राटदारांसह रंगाच्या व्यापाऱ्यांसह पायाभूत सुविधांच्या साहित्यांची खरेदी जोमाने सुरु झालेली आहे.
अधिवेशनासाठी हजारो कर्मचारी व मोर्चासाठी लाखो नागरिक १५ ते २० दिवसांसाठी शहरात येतात. रविभवन व आमदार निवासात रोजंदारीने कामगार नेले जातात. अधिकारी व मंत्री हॉटेलमध्ये वास्तव्याला असतात. त्यामुळे लहान पानठेला चालक ते हॉटेलचालकांसाठी हा सुगीचा काळ असतो. त्यातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते.
यांना मिळतो रोजगार
लॉज, रिक्षा, ई रिक्षा, पाणीपुरी विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेते, पर्यटन क्षेत्र, हॉटेल व्यावसायिक, पेपर विक्रेते, चहा विक्रेते, बूट पॉलीश करणारे कारागीर, मंडप आणि डेकोरेशन, केटरिंग, पेंटर, अंशकालीन कर्मचारी, झेरॉक्स मशिन चालक, फरसाण विक्रेते, स्वीट मार्ट चालक, खानावळ संचालक, फळविक्रेते, हॉटेल्स आदी.
दोन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. अधिवेशनाच्या काळात लहानात लहान व्यावसायिकांपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलला अच्छे दिन येतात. यंदाचे अधिवेशन बाजारपेठेला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. अधिवेशनाच्या काळाच्या काळात दहा हजार कोटीची उलाढाल अपेक्षित आहे. करारानुसार हे अधिवेशन चार आठवड्यांचे व्हायला हवे.
- बी.सी. भरतीया, अध्यक्ष, अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ