Nagpur : सहा महिन्यांतच रस्ते उखडतात कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : सहा महिन्यांतच रस्ते उखडतात कसे?

जलालखेडा : बांधकाम केल्यानंतर सहा महिन्यात रस्त्यांवर खड्डे पडत असून यामुळे अपघात झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न सध्या विचारल्या जात आहे. बांधकाम विभागही मूग गिळून बसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नरखेड तालुक्यातील गावखेड्यातील एकही रस्ता दर्जेदार राहिलेला नाही. सर्व रस्त्यांवर एक तर खड्डे पडले आहेत किंवा रस्ते अरुंद आहेत. या शिवाय चांगल्या साइडपट्ट्या नाहीत आणि त्यात भर आता रस्त्याच्या दुतर्फा वेड्याबाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या बाभळीच्या झाडांमुळे अनेक अपघात होत असून काही ठिकाणी वळणावर किंवा चौफुला या ठिकाणी तर या झाडांमुळे काही जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर काही जण आयुष्यभरासाठी अपंग झाले आहेत. या रस्त्यांच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद आणि मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामीण सडक योजना या सर्वच विभागांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कामाच्या दर्जावर संबंधित विभागाचे लक्ष नसल्याने सहा महिन्यांतच रस्ते उखडतात. यामुळेच नरखेड तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

नरखेड तालुका भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून या तालुक्याला मध्यप्रदेश व राज्यातील अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. यामुळे या तालुक्यात नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच जिल्ह्यात क्षेत्रफळाने ही नरखेड तालुका सर्वांत मोठा आहे. या तालुक्यात ग्रामीण रस्ते, शिव रस्ते, पांदण रस्ते याचबरोबर राज्यमार्गाचे रस्ते आहेत; मात्र, तुलनेने चांगले रस्ते अभावानेच आहेत. जिल्ह्यात रस्त्यांचे सर्वांत मोठे जाळे असलेला तालुका म्हणून नरखेड तालुक्याची ओळख असली तरी मात्र हे रस्ते आता खड्डेमय झाले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लक्ष नसल्यामुळे या रस्त्यांची वाट लागली आहे. ग्रामीण भागामध्ये रस्ते असे आहेत की तिथे एकदा माणूस गेला तर पुन्हा जाण्याचे नाव घेत नाही.

रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व इतर संबंधित विभागाचे कार्य आहे. पण नरखेड तालुक्यातील या विभागांचे रस्ते सध्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. पण या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे या विभागांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

ठेकेदारांचे चांगभले

संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांचे चांगभले होते. पण मात्र ठगला जातो तो सामान्य नागरिक. यामुळे रस्ता चांगला होऊन तो टिकला पाहिजे. असे काम करून घेण्याची जबाबदारी असतानादेखील, असे होते नाही. वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.