Nagpur : टाटा,वेदांता प्रकल्प राज्यातून गेल्‍याचे खापर ‘मविआ’ वर कसे- वरुण सरदेसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varun-sardesai

Nagpur : टाटा,वेदांता प्रकल्प राज्यातून गेल्‍याचे खापर ‘मविआ’ वर कसे- वरुण सरदेसाई

नागपूर : वेदांता प्रकल्प राज्यातून गेला तेव्हा सर्व खापर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर फोडण्यात आले होते. आता तीन महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला कसा गेला, याचे उत्तर शिंदेसेना-भाजपच्या सरकारने द्यावे, अशी मागणी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली.

चांगले झाले तर आम्ही आणि वाईट झाले तर महाविकास आघाडी सरकावर खापर फोडायचे ही भाजपची सवयच आहे. वेदांता गेला तेव्हा मोठमोठ्या घोषणा या सरकारने केल्या होत्या. वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणला जाईल असे दावे केले होते.

टाटा एअरबसचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये होईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्याचे उत्तर देण्याऐवजी पुन्हा आघाडीवर खापर फोडण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही.

सरकारचे कोणाचे आहे आणि कोणी घोषणा केली होती, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांची सुरक्षा काढून मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप वरुण सरदेसाई यांनी केला.

आम्हाला नको, जनतेला सुरक्षा द्या

काल अमरावती दौऱ्यावर असताना माझी सुरक्षा काढली असल्याचे मला कळले. कुणाला सुरक्षा द्यायची व नाही द्यायची हे ठरवणे शासनाचे काम आहे. आम्हाला सुरक्षेची गरज नाही. मात्र शिंदेसेनेने नागरिकांच्या सुरक्षेची तरी किमान जबाबदारी घ्यावी.

आज घडीला राज्यातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेले. ओला दुष्काळ अजूनही शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नाही. त्यावरही कोणी बोलायला तयार नाही. कोणाची तरी सुरक्षा काढून वादग्रस्त बोलायचे, हे फोडाफोडीचं राजकारण बंद व्हायला हवे, असेही देसाई म्हणाले.