नागपूर : पैसे घेऊन बदली करता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Zilla Parishad Transfers By taking money Allegation

नागपूर : पैसे घेऊन बदली करता?

नागपूर : जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू आहे. समुपदेशनातून या बदल्या होत असल्या तरी अनेकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने यात अन्याय झाल्याने संताप व्यक्त करीत पैसे घेऊन बदली करता का, असे थेट आरोपच केला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

बुधवारी सामान्य प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पडली. यावेळी सीईओ योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.

सूत्रांच्या माहितीनुसार कामठी तालुक्यातील गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) येथे कार्यरत एक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे बदलीमध्ये नाव होते. पण तेथे तो एकमेवच चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत असल्याने त्याची बदली करणे शक्य नव्हते. हा कर्मचारी पीएचसीत मागील १२ ते १३ वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूर ग्रामीणमध्ये बदली करण्याची प्रशासनाला विनंती केली. परंतु पीएचसीत एकमेव पद असल्याने तिथे कर्मचाऱ्याने आपसी बदलीतून दुसऱ्या कर्मचाऱ्याशी बोलणे करावे व त्यानंतर प्रशासनाकडून त्यांची बदली शक्य असल्याचे सांगण्यात आले. अनुकंपा तत्त्वावर पुढे भरती प्रक्रिया झाल्यानंतर बदली करण्यात येईल, असे सांगितले.

अधिकाऱ्यांचे प्रयत्न व्यर्थ

बदलीविषयीच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत कर्मचारी चांगलाच संतप्त झाला. त्याने आवाज चढवून अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू केले. ‘तुम्ही पैसे घेऊन बदली करता’, असा थेट आरोपच त्याने केला. अधिकाऱ्यांनी त्याची समजही काढण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो समजण्याच्या पलीकडे होता.