Nagpur : वैदर्भीय कलावंत शंतनूच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : वैदर्भीय कलावंत शंतनूच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर : वैदर्भीय कलावंत शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट ऐका पैठणीची’ या चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले आहे. मुळचे सिंदेवाही (जि.चंद्रपूर) तालुक्यातील नवरगाव येथील रहिवासी असलेले शंतनू रोडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले आहे.

नवरगावसारख्या एका लहानशा गावातील कलाकाराने मिळविलेले हे यश विदर्भासह महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाची बाब ठरली आहे. शंतनू रोडे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारत विद्यालय येथे, तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूर गाठले. प्रथम धरमपेठ महाविद्यालयातून पदवी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातून प्रथम इंग्रजी विषयात व त्यानंतर ललित कला विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. शंतनू यांचे वडील गणेश रोडे झाडीपट्टी रंगभूमीवर व्यंकटेश नाट्य मंदिराचे सुप्रसिद्ध कलावंत. त्यामुळे, लहानपणापासून कथा प्रेक्षकांसमोर येण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी जवळून पाहिला होता.

शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्षेत्रातच कार्य करण्याचे त्यांनी ठरविले. मागील १५ वर्षापासून ते चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत १२ चित्रपटासाठी पटकथा व संवाद लेखन केले. तसेच जयजयकार व हनुमान (ॲनिमेटेड) या चित्रपटाचे ते लेखक, दिग्दर्शक व निर्मातेही राहिले आहेत.

त्यांना जयजयकार या चित्रपटासाठी २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. आज त्यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे, विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

पुरस्कार गाव-खेड्यासाठी प्रेरणादायी

दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यामध्ये पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. विदर्भातील एका छोट्याशा गावातून पुढे येत आज मी हे यश गाठले आहे. त्यामुळे, जीवनात अशक्य काहीही नसल्याचे तो म्हणाला. लहान गावातील असल्यामुळे आपल्या आवाक्यात नाही, असा समज आपण करायला नको. आपण ठरवले तर काहीही साध्य करू शकतो. फक्त मेहनत घ्यावी लागते. मला मिळालेले हे यश कदाचित गावातील एखाद्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरू शकेल, असेही त्याने नमूद केले.