
नागपूर : भोसले काळापासून प्रसिद्धी झोतात आलेल्या नागपुरी साडीला (nagpuri saree) भौगोलिक निर्देशन(GI) मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. देशाच्या विविध भागातील राजे महाराजे यांच्याकडे या साड्यांची विशेष मागणी होती. रंग संगती आकर्षक असल्याने अनेकांना भूरळ घातली होती. त्या साडीला पुन्हा गतवैभव मिळविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे.
नागपुरी साडीसोबत हिमरु शाली व फॅब्रिक आणि सोलापूरच्या वॉल हॅंगीगला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी पैठणी साडी आणि टस्सर करवती साडीला जीआय मानांकन मिळाले आहे. पैठणी साडीच्या नावानं कोणतीही साडी खपवण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळेच या साड्यांना जीआय मानांकन घेण्यात आले आहे. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांच्या कलेला वैभव आणि सोबतच अर्थाजन व्हावे म्हणून जीआय मानांकन प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपुरी कॉटन साडीची वैशिष्ट्ये -
पारंपारिक आणि वजनाला हलकी
सहा आणि नऊ वारात उपलब्ध
६० व ८० नंबरमध्ये विणण्यात येतात
डिझाईन्स प्लेन, चेक्स, बुट्टे
बॉर्डरला पारंपारिक नक्षीकाम
भोसले काळात विणकरी व्यवसायाची भरभराट झाली. त्यातही नागपुरी साडी सर्वत्र प्रसिद्धी झोतात आली. देशाच्या विविध भागातील राजे महाराजे यांच्याकडे या साड्यांची विशेष मागणी होती. रंग संगती आकर्षक असल्याने अनेकांना भूरळ घातली. पैठणीचा उगम नागपुरी साडीतून झाल्याचा उल्लेख आहे. पैठणी साडी जशी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच टसर करवती साडीही विदर्भात प्रसिद्ध होती. नागपुरी साड्या नागपूर, खापा, उमरेड, सावनेर, पवनी आणि भिवापूर या भागात मोठ्या प्रमाणात विणल्या जात होत्या.
जीआय'चे महत्त्व -
एखाद्या विशिष्ट भागात उगम असणाऱ्या आणि एकमेवाद्वितिय वैशिष्ट्ये असणाऱ्या उत्पादनांचे वेगळेपण टिकविण्यासाठी भौगोलिक मानांकन (जीआय) देण्याची ही पद्धत आहे. यातून, या उत्पादनांचे वेगळेपण आणि त्याचा दर्जा टिकविण्याची हमी मिळते. यासाठी हे उत्पादन संबंधित विभागाचेच असल्याचे स्पष्ट करावे लागते. भारतामध्ये २००४ मध्ये सर्वांत पहिल्यांदा दार्जिलिंगच्या चहाला हे मानांकन मिळाले होते.