Bhandara ZP Election | भंडाऱ्यात काँग्रेस एकाकी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar Devendra Fadnavis

भंडाऱ्यात काँग्रेस एकाकी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची करीत भाजपला सुरूंग लावला व भाजपमधल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने बंड करून काँग्रेसला यश मिळवून दिले. या बंडखोरीमुळे व भंडाऱ्यासोबतच गोंदिया येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघमारे यांना भाजपातून निलंबित केल्याची घोषण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली.

भंडारा जि.प.च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वात जास्त २१ सदस्य निवडून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, तर भारतीय जनता पक्षाचे १२ सदस्य निर्वाचित झाले होते. अन्य सदस्यांमध्ये शिवसेना १, वंचित आघाडी १, बसप १ आणि अपक्ष ३ सदस्य होते. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजप, शिवसेना, वंचित आघाडी व बसपासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे या नव्या आघाडीचा विजय नजरेत होता.

जि.प.मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याला बहुमतासाठी सहा सदस्यांची गरज होती. आज मंगळवारी जि.प. पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी गेले चार ते पाच दिवसांपासून काँग्रेसकडून राष्ट्रवादीची मनधरणी सुरू होती. मात्र राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेसने आक्रमक रणनीती अवलंबून भाजपमधील माजी आमदार चरण वाघमारे यांचे नेतृत्व मानणाऱ्या पाच सदस्यांच्या गटासोबत हातमिळवणी केली. संदीप ताले यांच्या नेतृत्वातील या बंडखोर गटाने काँग्रेसला पाठिंबा दिला. हा गट व एक अपक्ष सदस्य यांच्या मदतीने जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे विजयी झाले. उपाध्यक्षपदी बंडखोर भाजपा गटाचे ताले आरूढ झाले.

गोंदियात भाजप-राष्ट्रवादी

गोंदिया जिल्हा परिषदेतही आज मंगळवारीच जि.प. पदाधिकाऱ्यांची निवड होती. तेथेही भंडारा जिल्हा परिषदेप्रमाणेच भाजपा व राष्ट्रवादीने युती केली. ५३ सदस्यीय गोंदिया जि.प.मध्ये २६ सदस्यीय भाजपला बहुमतासाठी केवळ एका मताची गरज होती. तेथे काँग्रेसचे १३ व राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले होते. अन्‍य सदस्यांमध्ये ४ सदस्य चावी संघटनेचे, तर २ सदस्य अपक्ष होते. येथे काँग्रेसला एकाकी पाडून भाजपचा अध्यक्ष, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष निवडून आला.

Web Title: Ncp Coalition With Bjp In Bhandara Zp Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top