
सर्वच विद्यापीठात ‘ऑफलाइन एमसीक्यू’ परीक्षेचा पॅटर्न - उदय सामंत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये ‘ऑफलाइन एमसीक्यू’ (बहुपर्यायी प्रश्न) परीक्षेचा पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येणार आहे. या पॅटर्नला विरोध होत असताना, आता अशाच पॅटर्ननुसार तेराही कृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
राज्यातील सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात असा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत झाला. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन (वर्णनात्मक) होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर तब्बत २५ दिवसांनी नागपूर विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा आणि पद्धतीची घोषणा केली. यामध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, त्यात बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञानी टिका केली. त्यानंतर मंगळवारी (ता.२४) गोंडवाना विद्यापीठानेही याच पद्धतीनुसार परीक्षा घेण्याचे ठरविले.
त्यावर आज सकाळी दीक्षान्त कार्यक्रमानंतर उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता, ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. याशिवाय ती कशी घ्यावी हाही निर्णय सर्वस्वी कुलगुरूंवर असल्याने त्यावर काही बोलता येणार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता सर्वच विद्यापीठांना अशाच प्रकारे परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील सर्वच विद्यापीठ ‘ऑफलाइन एमसीक्यू’ पॅटर्ननुसार परीक्षा घेतील असे दिसून येत आहे.
अनेकांनी ऑनलाइनसाठी निवेदन दिले. मात्र, कोरोना संपला असल्याने आता केवळ ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आता विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ऑफलाइनचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी कोणत्या पद्धतीने ती परीक्षा पार पाडावी ही त्यांची जबाबदारी आहे, त्यात ढवळाढवळ करणार नाही.
- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
Web Title: Offline Mcq Exam In All Universities Uday Samant Quality Of The Exam Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..