ऑनलाइन ‘गेम’च्या नादात बीबीएचा विद्यार्थी बनला चोर अन् भिंतीवर लिहिले ‘राजा बाबू’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thieft

ऑनलाइन ‘गेम’च्या नादात बीबीएचा विद्यार्थी बनला चोर

नागपूर : मित्रांकडून कर्ज घेऊन मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्यात रक्कम हरल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी बीबीएच्या विद्यार्थ्याने चोरीचा मार्ग पत्कारला. त्याने वस्तीतच घरफोडी करून दोन लाखांचा डल्ला मारला. पैसे येताच त्याने ऑनलाइन गेमवर खर्च केले. मात्र, पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारावर चोरट्याला अटक केली. दिवेश मनोज खख्खर (१९, रा. जलारामनगर, कळमना) असे चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल रमेशकुमार वसानी (४५, रा. जलारामनगर) हे १४ नोव्हेंबरला कळमेश्‍वरला असलेल्या श्री. हरी धाम येथे भागवत कथा ऐकण्यासाठी गेले होते. रात्री साडेअकरा वाजता ते कुटुंबासह परत आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन बघितले असता कपाट आणि लॉकर तुटलेले दिसले. घरातील दोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि काही ३० हजार रोख रक्कमही चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच कळमना पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. ठाणेदार विनोद पाटील यांना गुप्त खबऱ्याने झालेल्या चोरीची माहिती दिली. त्यांनी लगेच लता मंगेशकर गार्डनजवळ सापळा रचला. त्या सापळ्यात संशयित आरोपी दिवेश मनोज खख्खर अडकला. त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले असता त्याने चोरीची कबुली दिली. ही कारवाई पोलिस उपायुक्त मनीष कलवानीया, नवनियुक्त एसीपी नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनोद पाटील यांच्या पथकाने केली.

विद्यार्थी ते चोर प्रवास

आरोपी दिवेश हा नामांकित कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत आहे. त्याला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. त्याने मित्रांकडून कर्ज घेऊन मोबाईल गेममध्ये पैसे उडवले होते. त्याच्यावर मित्रांचे कर्जसुद्धा झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याला घरफोडी करण्याची कल्पना सूचली. त्याने वसानी यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी केली.

भिंतीवर लिहिले ‘राजा बाबू’

दिवेशने पहिल्यांदाच चोरीचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरी केलेल्या घरात भिंतीवर ‘राजा बाबू’ असे नाव लिहिले. घरात चोरी करणाऱ्या चोरट्याचे नाव राजा बाबू समजून पोलिसांची त्याने दिशाभूल करण्याचे प्रयत्न केला. चोरलेल्या सोन्याच्या दागिन्यांची कशी विल्हेवाट लावावी, याबाबतही त्याला माहिती नव्हते. म्हणून त्याने दोन लाखांचे दागिने छतावर ठेवलेल्या फुटक्या मडक्यात ठेवले होते.

२००, १०० नोटांना लावला नाही हात

चोरट्यांनी लॉकरमध्ये असलेल्या २ हजार आणि पाचशेच्याच नोटा चोरून नेल्या. परंतु, बाजूलाच ठेवलेल्या २००, १०० आणि ५० च्या नोटांना हातसुद्धा लावला नाही. हा प्रकार लक्षात येताच पोलिसही चक्रावले. स्मार्ट आणि नवखा चोरटा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली.

टॅग्स :thief