Orange Fruit : संत्र्याला नाही कोणी वाली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Orange fruit Demand Export

Orange Fruit : संत्र्याला नाही कोणी वाली!

वरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी बिरुदावली मिळविणाऱ्या वरुड तसेच मोर्शी, अचलपूर, अंजनगाव व चांदूरबाजारमधील संत्र्याचे काय हाल आहेत हे पाहण्याची कुणालाच सवड नाही. सरकार बदलले; मात्र संत्राफळाला कधी राजाश्रय मिळेल, असा सवाल केला जात आहे. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे फळ वाचविण्यासाठी कोण पुढाकार घेणार, हे मात्र कळायला मार्ग नाही.

जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, अंजनगाव हा परिसर संत्राबागांनी समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादित करून देशाच्या कानाकोपऱ्यात संत्रा पाठविला जातो. आंबट, गोड, रसाळ संत्रा खवय्यांच्या पसंतीचे फळ असले तरी शासकीय धोरण, लोकप्रतिनिधींची अनास्था आणि यातूनच संत्र्याला राजाश्रय न मिळाल्याने संत्र्याची आंबट-गोड कहानी मात्र दिवसेंदिवस कडू होताना दिसून येत आहे. संत्र्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तसेच शरीराला आवश्यक असलेले फायबरही मोठ्या प्रमाणात आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी संत्रा फळाचा आग्रह धरला जातो.

संत्र्याच्या सालीपासून पावडर तयार करून ते सौंदर्य प्रसाधनात वापरले जाते. आरोग्यवर्धक फळ म्हणून संत्रा प्रचलित आहे. मात्र, सर्वगुणसंपन्न असूनही सापत्न वागणूक मिळत असल्याने इतर फळांच्या मानाने संत्रा मागे पडताना दिसून येतो. जिल्ह्यातील संत्रा देशाच्या कानाकोपऱ्यात निर्यात केला जातो. देशात संत्राफळांना मोठी मागणी आहे.

संत्रा आरोग्यासाठी गुणकारी असला तरी त्याची वाताहत मात्र थांबता थांबत नाही. भरघोस उत्पादन होऊनही या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस अजूनही आलेले नाहीत. परिसरात संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही. २०१७ मध्ये मोर्शी येथील ठाणाठूनी येथे संत्राप्रकल्प निर्मितीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. मात्र, पाच वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्प अपुराच आहे. त्याबरोबर मायवाडी व काटोल येथेही संत्राप्रकल्प उभा राहिला होता. मात्र, ते दोन्ही प्रकल्प धूळखात आहेत. या अनास्थेमुळे आरोग्यदायी संत्रा दुर्लक्षित राहिला.

संत्र्यामधील पोषकतत्त्वे

संत्र्यामध्ये कॅलरीज ६०, फायबर्स ३ ग्रॅम कार्बेाहायड्रेड १५ ग्रॅम, साखर १२ ग्रॅम, प्रोटीन्स १ ग्रॅम, व्हिटॅमिन ए १४ मायक्रो ग्रॅम, व्हिटॅमिन सी ७० मिली ग्रॅम, कॅल्शियम ५२ मिली ग्रॅम, तर पोटॅशियम २३७ मिली ग्रॅम आहे.

संत्रा लागवडीखालील क्षेत्र

  • वरुड : २१ हजार हेक्टर

  • अचलपूर : ११ हजार हेक्टर

  • अंजनगावसुर्जी : ३३०० ते ३४०० हेक्टर

  • मोर्शी : १३ हजार ३५४ हेक्टर

Web Title: Orange Fruit Demand Export Health Benefit Devendra Fadnavis Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..