ऑनलाइन वर्ग बंद करणाऱ्या शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करा, पालकांची पोलिसांत तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beltarodi police station

ऑनलाइन वर्ग बंद करणाऱ्या शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करा, पालकांची पोलिसांत तक्रार

नागपूर : शाळेचे शुल्क न भरल्यामुळे ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून (online classes) काढून टाकणाऱ्या नारायणा शाळेतील (narayana school) व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करा, अशी तक्रार पालकांनी बेलतरोडी पोलिसांकडे (beltarodi police) शुक्रवारी (ता.२१) केली. (parents demand to file fir aginst school those closed online clases in nagpur)

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

कोरोनातही शाळांकडून शुल्कासाठी सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे या विरोधात पालक संघटनांनी सातत्याने उपसंचालक आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन सादर केले. त्यावरून शाळांवर वसुलीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतरही काही शाळांनी शुल्काचा तगादा पालकांकडे लावला आहे. वर्धा मार्गावर असलेल्या नारायणा शाळेद्वारे ज्या पालकांनी शुल्क भरले नाही, त्यांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यास सुरुवात केली. यात जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत पालकांनी शाळेला विचारणा केली असता, शुल्क न भरल्यामुळे पाल्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी करून न घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, यावर पालकांनी केवळ ऑनलाइन शिक्षणापुरते शुल्क घेण्याची विनंती केली. तसेच कोरोनामुळे शुल्क भरण्यास थोडा अवधी मागितला. विशेष म्हणजे, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित करता येत नसल्याने आज शुक्रवारी पालकांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठले. याशिवाय आरटीई कायद्यानुसार नारायणा शाळेतील व्यवस्थापन मंडळावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली. याबाबत पोलिस निरीक्षक विजय आकोत यांचेशी संपर्क केला असता, त्यांनी संबंधित निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविले असल्याचे सांगितले. यावेळी जवळपास ३४ पालक उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल

कोरोनाच्या संसर्गाने अनेक पालक हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नारायणा शाळेकडून शाळा शुल्कासाठी पालकांना वारंवार त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शुल्कासाठी शिक्षण थांबवता येणार नाही असे आदेश दिले असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला न जुमानता शुल्क वसुलीसाठी सक्ती करण्यात येत आहे.

loading image
go to top