esakal | अर्धवट सिमेंट रस्त्यांचे नागपूरकरांना धक्के
sakal

बोलून बातमी शोधा

Partial cement roads hit Nagpurkars

डांबरी रस्त्यांची दरवर्षी अक्षरशः चाळणी होऊन नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने महापालिकेने टिकाऊ रस्त्यांसाठी सिमेंटीकरणावर भर दिला. सिमेंट रस्त्यांमुळे ५० वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची गरजच राहणार नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सिमेंट रस्ता टप्पा एक, टप्पा दोन व टप्पा तीनअंतर्गत शहरात कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत.

अर्धवट सिमेंट रस्त्यांचे नागपूरकरांना धक्के

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागपूरकरांच्या पाठीचा कणा मोडल्यानंतर आता अर्धवट सिमेंट रस्‍त्यामुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्ध्यावर असून, आयब्लॉक लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे कायम आहेत. सिमेंट रस्ता झाल्यानंतर मूळ रस्त्यांवर सहज वाहन उतरण्याचीही सोय नाही. सपाटीकरण झाले नसल्याने सिमेंट रोडवरून मूळ रस्त्यावर खाली उतरताना अनेकदा वाहने घसरून किरकोळ अपघात होत आहेत. सिमेंट रस्त्याच्या धारदार किनाऱ्यावर डोके आदळून एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महापालिका व कंत्राटदार मूग गिळून बसल्याने संताप वाढत आहे. 

डांबरी रस्त्यांची दरवर्षी अक्षरशः चाळणी होऊन नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने महापालिकेने टिकाऊ रस्त्यांसाठी सिमेंटीकरणावर भर दिला. सिमेंट रस्त्यांमुळे ५० वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची गरजच राहणार नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सिमेंट रस्ता टप्पा एक, टप्पा दोन व टप्पा तीनअंतर्गत शहरात कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु कोरोनामुळे शहरातील सुरू असलेली अनेक सिमेंट रस्त्यांची कामे बंद झाली.

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही अनेक सिमेंट रस्त्यांची कामे बंद आहेत. दत्तात्रयनगर ते महाकाळकर सभागृहापर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू आहे. सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. परंतु रस्त्याच्या बाजूला अद्याप आयब्लॉक लावले नाही. दुसऱ्या दुभाजकाकडील जागाही मोकळी आहे. त्यामुळे एखादवेळी सिमेंट रस्त्यावरून वाहनधारकांचे वाहनावरील संतुलन गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एवढेच नव्हे सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यानंतर डांबरी रस्त्यावर वाहने उतरताना मोठे धक्के सहन करावे लागतात. हीच स्थिती वर्दळीच्या सक्करदरा चौकात आहे. सक्करदरा चौकातून गजानन चौकापर्यंत सिमेंट रस्ता पूर्ण झाला. परंतु दुभाजकाची नाली कायम आहे. यात एखादवेळी चारचाकी वाहन फसण्याची शक्यता आहे. एकीकडे सिमेंट रस्ते उंच झाल्याने नागरिकांची घरे खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे.

भाजपमध्ये खळबळ; झोन सभापतींच्या पतीचा ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘काम झाले हिशेब कधी करतो’

पावसाळ्यात थेट पाणी घरांत शिरते. त्यात अर्धवट सिमेंट रस्त्यांनी लाखो नागरिक त्रस्त आहे. शताब्दी चौक ते रामेश्वरी, तुकडोजी पुतळा ते मानेवाडा येथील सिमेंट रस्त्यांचीही हीच स्थिती आहे.

 
ऑरेंज सिटी स्ट्रीटची चाळणी, धुळाने नागरिक त्रस्त
ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाच्या नावावर रेडीसन ब्लू हॉटेल ते जयताळा मार्गापर्यंतचा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. बेसा, बेलतरोडीसह दक्षिण तसेच दक्षिण-पश्चिम नागपुरातील हिंगणा एमआयडीसीत काम करणाऱ्या अनेक चाकरमान्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु यावर खड्डे आहेत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांसाठी खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने नागरिकांना वाहने काढताना सर्कस करावी लागते.
 

नारा घाट कुशीनगर ते साई मंदिर रिंग रोड चौक हा पाचशे मीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. परंतु कुशीनगर येथील भूखंड क्रमांक ६७ ते ७३, ४९ ते ५४ पर्यंत ३०० फुटांचा रस्ता अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे येथे घाण पाणी साचते. याबाबत मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही.
राजेंद्रकुमार, नागरिक, कुशीनगर.
 

loading image
go to top