मेडिकलला शीतवार्डचा विसर! वरिष्ठ एसी, कुलरच्या गारव्यात तर रुग्ण उकाड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hosppatient suffer heat wave Medical Senior are in AC room nagpur ital
मेडिकलला शीतवार्डचा विसर! वरिष्ठ एसी, कुलरच्या गारव्यात तर रुग्ण उकाड्यात

मेडिकलला शीतवार्डचा विसर! वरिष्ठ एसी, कुलरच्या गारव्यात तर रुग्ण उकाड्यात

नागपूर : उन्ह आता चांगलेच तापू लागले आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच पाऱ्याने चाळीशी गाठली. एप्रिलमध्येही पारा ४१ च्या आसपास आहे. वाढते तापमान पाहता येथील शासकीय रुग्णालयात (मेडिकल) एव्हाना शीतवार्ड सज्ज असायला हवा होता. परंतु, मेडिकल प्रशासनाला शीतवार्डचा विसर पडला आहे. वरिष्ठ अधिकारी एसी, कूलरची हवा खात असून रुग्ण उकाडा सहन करीत आहेत.

२३ मार्च ते १ एप्रिल या काळात दरवर्षी शीतवॉर्ड तयार होतो. परंतु यावेळी अद्यापही तयार करण्यात आला नाही. भर उन्हात कष्टाची कामे करताना उष्माघाताचा फटका बसू शकतो. रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी मेडिकलमध्ये दरवर्षी एक एप्रिलपर्यंत शीतवॉर्ड तयार करण्यात येतो. पण, यावर्षी हा वॉर्ड तयार करायला मेडिकल प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे रुग्णांच्या काळजीबाबत रुग्णालय किती बेजबाबदार आहे, हे उघड झाले आहे.

मागील तीन वर्षांपासून वॉर्ड क्रमांक २३ मध्ये दरवर्षी शीतवॉर्ड तयार करण्यास येतो. यावर्षी तीन एप्रिल उलट्यानतंरही शीतवॉर्ड तयार होऊ शकला नाही. परिणामी, उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यास अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब एखाद्या रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. मेडिकलच्या विभागप्रमुख, वरिष्ठ डॉक्‍टरांच्या कक्षात वातानुकूलित यंत्र आहेत. परंतु वॉर्डात मात्र अद्याप कुलर सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण रुग्ण शर्ट काढून खाटेवर झोपलेले दिसतात. लिपिकांच्या खोलीतही गारवा देणारे कुलर दिसत आहेत, परंतु काही वॉर्डात कुलर सुरू झाले नाहीत.

बाह्यरुग्ण विभागात कोण घेणार नोंद?

मेडिकल असो किंवा मेयो, या शासकीय रुग्णालयांना उष्माघाताच्या प्रत्येक रुग्णाची नोंद बाह्यरुग्ण विभागात घेणे बंधनकारक आहे. परंतु मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत बाह्यरुग्ण विभागात ही नोंद कोण करेल? हा प्रश्‍न आहे. दाखल रुग्णांव्यतिरिक्त उन्हाचा इतिहास घेण्यात येत नसल्याची माहिती पुढे आली.

उष्माघाताची लक्षणे

 • सुरूवातील थकवा येणे

 • सतत तहान लागणे

 • अस्वस्थ वाटणे

 • डोके दुखणे

 • जीभ कोरडी पडणे

 • त्वचा लाल होणे

 • हृदयाची धडधड वाढणे

 • रक्तदाब कमी होणे

 • आकडी येणे

 • चक्कर येणे

 • पायाला गोळे येणे

 • बेशुध्द पडणे

वॉर्ड क्रमांक २३ मध्ये शीतवॉर्ड तयार करण्यासाठी कुलर दिले आहेत. डॉ. अर्चना देशपांडे यांच्याकडे शीतवॉर्डाची जबाबदारी दिली आहे. अद्याप उष्माघाताचे रुग्ण आले नाहीत. ४५ अंशाजवळ पारा पोहचल्यानंतर उष्माघाताच्या रुग्ण येण्याची शक्यता असते.

- डॉ. अतुल राजकोंडावार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

Web Title: Patient Suffer Heat Wave Medical Senior Are In Ac Room Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top