Pench Tiger Project : पेंच व्याघ्र सफारी मे महिन्यात हाऊसफुल्ल; प्राण्यांच्या दर्शनाने पर्यटकांचा वाढला ओढा

हमखास व्याघ्र दर्शनामुळे नावारूपास आलेल्या ताडोबा- अंधारी प्रकल्पानंतर आता पेंच प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.
Pench Tiger Project
Pench Tiger ProjectSakal

नागपूर - हमखास व्याघ्र दर्शनामुळे नावारूपास आलेल्या ताडोबा- अंधारी प्रकल्पानंतर आता पेंच प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळेच मागील वर्षी एक लाखांचा पर्यटकांचा आकडा पार केलेला असताना येथील सफारी मे अखेरपर्यंत हाउसफुल्ल झाली आहे. ताडोबा- अंधारी, उमरेड-कऱ्हांडला-पवनी, टिपेश्वर अभयारण्यातील तारखाही बुक झाल्या आहेत. परिणामी, उन्हाळ्यातील पर्यटनाला अच्छे दिन आले आहे.

मागील दोन वर्षांपासून पेंच प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पॅराग्लायडिंग, हॉट बलून, कृषी पर्यटनासोबत व्याघ्र पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळेच या व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे ''ऑनलाइन बुकिंग'' हाउसफुल्ल झाले आहे. आक्टोबर महिन्यापासून पर्यटन सुरू झाले. त्यानंतर दिवाळीच्या सुटी, ख्रिसमस आणि हिवाळी अधिवेशनातही येथे पर्यटकांची तुफान गर्दी होती.

राज्यात सर्वाधिक वाघ असल्याने ताडोब्यात वाघाचे हमखास दर्शन होते अशी ख्याती निर्माण झाली होती. तीच प्रचिती आता पेंच व्याघ्र प्रकल्पाला मिळाल्याने पर्यटकांचा ओढा या प्रकल्पाकडे वाढलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला- पवनी अभयारण्यातही वाघ दिसत असल्याने तेथीलही बुकिंग हाऊस फुल्ल आहे. यंदा अवकाळी पावसाने हवामानात बदल झाला असला तरी दुपारी ऊन पडत असल्याने वन्यप्राण्यांचे दर्शन हमखास होत आहेत.

त्याच आकर्षणापोटी हवामानाचा विचार न करता पर्यटक पेंचसह उमरेड-कऱ्हांडलाकडे वळू लागले आहेत. शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे सरकारी सुट्ट्यांचा मुहूर्त पाहून अनेक पर्यटकांनी व्याघ्र पर्यटनस्थळांसाठी बुकिंग केले आहे. विदर्भासह मध्यप्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच व्याघ्र प्रकल्पातही हीच स्थिती आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खुर्सापार प्रवेशद्वाराचे मे महिन्याचे बुकिंग चांगले झाले आहे. हाऊस फुल्ल आहे. इतर प्रवेशद्वारांचे बुकिंगही होत आहे. वाघासह इतरही उपक्रमांमुळे पर्यटकांचा कल वाढलेला आहे.

- पूजा लिंमगावकर, सहाय्यक वनसंरक्षक

पेंच प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे त्याचे वनावरील अवलंबत्व कमी होण्यास मदत होत आहे.

- संदीप भारती, सहाय्यक वनसंरक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com