
अमरावती : ग्रामसडक योजनेला वेसण कुणाचे?
अमरावती : जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेली कामे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत. कंत्राटदाराला अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने बिनधास्तपणे या योजनेतील लाखो रुपयांच्या निधीची पुरती वाट लावण्याचे काम सध्या अमरावती जिल्ह्यात सुरू असल्याची ओरड आहे.
अमरावती जिल्ह्यात या योजनेंतर्गत सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक संख्येने रस्ते करण्यात आले आहेत. जिल्ह्यात योजनेअंतर्गत १८० किलोमीटरचे रस्ते तयार केले आहे. मात्र, त्यातील बहुतांश रस्त्यांच्या कामाचा दर्जा कमी असल्याची ओरड होत आहे. नांदगावखंडेश्वर तसेच चांदूरबाजार तालुक्यात रस्त्यांचे सील कोटिंग करण्यात आले नाही. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी भरघोस निधी देण्यात येतो. तर लोणी, दर्यापूर, अंजनगावसुर्जी भागातील रस्ते तयार होऊन सहा महिन्यांतच ते उखडण्यास सुरवात झाली आहे.
दरवेळी जिल्हा परिषदेच्या आमसभेत तसेच स्थायी समितीच्या सभेत योजनेच्या कामांच्या तक्रारी सभासदांकडून करण्यात येतात. मात्र, नोटीस देण्यापलीकडे अधिकाऱ्यांकडे उत्तरच राहत नाही. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने अमरावती जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे ऑडिट होऊन कंत्राटदार व अधिकाऱ्यांना वेसण घालणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेता मध्यंतरी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या योजनेचा आढावा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, मात्र ती केवळ चर्चाच ठरली.
ग्रामसडक योजनेअंतर्गत अनेक रस्त्यांचे सील कोटिंग करण्यात आले नसून कंत्राटदारांना देयके देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून ही कामे प्राधान्याने करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद
ज्या रस्त्याचे सील कोटिंग उखडले आहे त्याची दुरुस्ती करण्यास कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. अन्य रस्त्यांबाबत तक्रारी नाहीत.
- आय.आय. खान, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना