
अन् चोरटा घुसला शौचालयात; मालकाने घेतली कडी लावून
नागपूर : बंद असलेल्या हार्डवेअरच्या दुकानात दोन चोरट्यांनी चोरी करण्याचे ठरविले. नियोजनानुसार हातोडी, छन्नी, दोरी आणि अन्य साहित्यासह दुकानाच्या मागची भिंत फोडण्यासाठी सज्ज झाले. दोघेही दुकानाची मागची भिंत फोडायला लागले. दरम्यान दुकानाचा मालक दुकानात आला. ‘ठक-ठक’ असा आवाज येत असल्याने त्याला संशय आला. त्यामुळे त्याने दुकानाच्या मागे जाऊन बघितले. भिंतीला छिद्र पाडण्यात गुंग असलेल्या चोरट्याला बघून त्यांनी ‘चोर-चोर’ अशी आरडाओरड केली. त्यामुळे दोघांनीही मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. परंतु, त्यापैकी एकाने काही अंतरावर असलेल्या एका शौचालय गाठले आणि त्यामध्ये लपला. (Police-caught-the-thieves-trying-to-steal)
त्याच्या पाठोपाठ आलेल्या दुकानदाराच्या हे लक्षात आल्याने त्याने शौचालयाला बाहेरून कडी लावली आणि पोलिसांना फोन केला. काही मिनिटांत पोलिस पोहोचले आणि शौचालयाचा दरवाजा तोडून चोरट्याला ताब्यात घेतले. कृष्णा गोविंद दास (वय ३७) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्या माहितीवरून साथीदार धमेंद्र सोमनाथ शहा (वय २६ दोन्ही रा. गजानननगर) यालाही पोलिसांनी अटक केली.
एमआयडीसी परिसरात रंजीव सिंग (वय ४३ रा. लोकमान्यनगर) यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कृष्णा व धमेंद्र हे दुकानाच्या मागील भिंतीला छिद्र पाडत होते. याचदरम्यान सिंग यांनी दुकान उघडले. त्यांना आवाज आला. मागील बाजूने गेले. सिंग यांना बघून धमेंद्र हा पसार झाला तर कृष्णा हा दुकानाजवळील शौचालयात घुसला.
सिंग यांनी बाहेरून शौचालयाचा दरवाजा बंद केला. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने एमआयडीसी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी कृष्णा याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नंतर धमेंद्र याला अटक करण्यात आली.
(Police-caught-the-thieves-trying-to-steal)