काय आहे हरतालिकेचे महात्‍म्य आणि कशी करतात हरतालिकेची पूजा? घ्या जाणून

hartalika
hartalika

नागपूर : गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. यंदा शुक्रवार (ता. २१) रोजी हरतालिकेचे पुजन होणार आहे.
विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुषीसाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी हरतालिकेची पूजा करतात. तसेच हे व्रत भगवान शंकराची आराधना करण्यासाठी ही केले जाते. कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते.

अलिकडे महिला कुटुंबात सुख, शांती नांदावी, मुलांमध्ये चांगले विचार, आचारण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी हे व्रत करतात आणि भगवान शंकराला साकडे घालतात. असे म्हणतात की ज्यांना वर्षभर सोमवारी आणि महाशिवरात्रीला शंकराची पूजा करणे शक्य होत नाही, त्यांनी हे व्रत केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.

​हरितालिकेची कहाणी
हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. मात्र, पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व तिने शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.


कशी कराल हरतालिकेची पूजा
या दिवशी मुली आणि सुवासिनींनी अंगाला सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ जागेवर एका जागी चौरंग ठेवावा. रांगोळी काढून आणि केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षदा, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम गपपती पुजन आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.

पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.

सविस्तर वाचा - पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं

दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून शिवलिंगाचे विसर्जन करावे.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com