
...अन् राहुल बजाज यांची वर्धेची भेट ठरली शेवटची
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अमरावती मार्गावर ‘जमनालाल बजाज’ (Jamnalal Bajaj) नावाने भव्य प्रशासकीय इमारत (Building) आहे. अल्पावधीत या इमारतीचे बांधकाम झाले. मात्र, बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्या दातृत्वातून ती आज उभी झाली. ‘कार्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलीटी’च्या माध्यमातून दहा कोटी रुपये विद्यापीठाला बजाज समूहाने दिले होते.
विद्यापीठाचा पसारा मोठा असल्याने त्याचे बहुतांश विभाग विविध भागात विखुरलेले होते. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारत तयार करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या सिनेटमध्ये मांडण्यात आला होता. अनेक वर्षांच्या प्रस्तावावर केवळ चर्चा आणि निधीची तरतूद करण्यात येत होती. प्रत्यक्षात पाऊल उचलले जात नव्हते. मात्र, विद्यापीठाचे कार्यकारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारणारे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी त्याला मूर्त रूप देण्याचे ठरविले. त्यातून त्यांनी बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ‘कार्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलीटी’च्या माध्यमातून प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी देण्याचे बजाज यांनी मान्य केले. यातून विद्यापीठाने तीस कोटी खर्चून इमारतीचे निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे, या इमारतीचे ‘जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत’ असे नामकरण करण्यात आले. २६ सप्टेंबर २०१५ रोजी गुरूनानक भवन येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात राहुल बजाज यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी बांधकाम वेळेत झाल्यास पन्नास टक्के खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा: तब्बल ३५ दिवसांनी ५८ उंटांनी घेतला मोकळा श्वास
एकाच ई-मेलवर दिला होकार
प्रशासकीय इमारतीसाठी कार्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलीटीच्या माध्यमातून पैसे देण्याच्या अनुषंगाने तत्कालिक कार्यकारी कुलगुरू विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वित्झर्लंड येथे कामानिमित्त गेलेले राहुल बजाज यांना ई-मेल करीत माहिती दिली. या ई-मेलला वाचत काहीच मिनिटात त्यांनी होकार दिल्याचे अनुपकुमार यांनी सांगितले.
स्वतः बघितला होता नकाशा
आपण दिलेल्या पैशाचा योग्य वापर होतोय किंवा नाही, त्यातून तयार होणारी इमारत आदर्श ठरणार किंवा नाही याबाबत राहुल बजाज नेहमीच सतर्क राहायचे. त्यातूनच त्यांनी जी. एस. वाणिज्य महाविद्यालयात आले असताना अनुपकुमार आणि प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना बोलावून घेत इमारतीचा आराखडा पाहिला होता. यावेळी इमारतीच्या आराखड्याचे कौतुकही केल्याचे अनुपकुमार यांनी सांगितले.
२०१९ ला शेवटची भेट
वर्धा येथे दरवर्षी शिक्षा मंडळाच्या बैठकासाठी राहुल बजाज वर्धेला हजेरी लावायचे. त्यानुसार २०१९ मध्ये ते वर्धेला आले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी लावण्यात आल्याने ते वर्धेला येऊ शकले नाही. त्यामुळे ही भेट त्यांची शेवटली ठरल्याचे शिक्षा मंडळाचे सभापती संजीव भार्गव यांनी सांगितले.
Web Title: Rahul Bajaj Death Wardha Visit Last
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..