esakal | Nagpur : नागपूर विद्यापीठ यजमानपदासाठी उत्सुक
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर विद्यापीठ यजमानपदासाठी उत्सुक

नागपूर विद्यापीठ यजमानपदासाठी उत्सुक

sakal_logo
By
नरेश शेळके

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ २०२३ मध्ये स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने पुढील वर्षीपासून विविध कार्यक्रम, स्पर्धा, चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आशियाई विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करावे असा विचार पुढे आला आहे. हा विचार प्राथमिक पातळीवर असला तरी विद्यापीठ यासाठी सकारात्मक आहे.

लांब पल्याच्या शर्यती, क्रॉस कंट्री ही नागपूर विद्यापीठाची धावपटूंची ओळख राहिलेली आहे. १९८७ मध्ये चंडीगड येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे शरद सूर्यवंशी सध्या विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक आहेत. त्यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत. मात्र, हे सर्व प्राथमिक पातळीवर आहे. यासाठी सिनेटची मंजुरी, शताब्दी महोत्सव समितीची मंजुरी, कुलगुरूंची मंजुरी हे सर्व सोपस्कर पार पडल्यानंतरच प्रस्ताव पाठविण्याविषयी विचार करता येईल. निश्चितच आशियाई पातळीवरील स्पर्धा नागपुरात झाली तर यापेक्षा दुसरे भाग्य नाही. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

यजमानपद मिळविण्यासाठी विद्यापीठाला सर्व मंजुरी मिळाल्यानंतर एकत्रित प्रस्ताव एआययुला (असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी) कडे पाठवावा लागेल. त्यानंतर तो प्रस्ताव आशियाई युनिव्हर्सिटी स्पोर्ट्‍स फेडरेशनच्या (एयुएसएफ) बैठकीत ठेवण्यात येईल. त्यानंतरच यजमानपदाचा निर्णय होईल.

एयुएसएफची आभासी पद्धतीने होणारी बैठक ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहे. याबाबत सूर्यवंशी म्हणाले, खरे तर आम्ही २०२२ च्या जागतिक विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी उत्सुक होतो. याविषयी एआययुसोबत चर्चा झाली होती. मात्र, या स्पर्धेचे यजमानपद यापूर्वीच पोर्तुगालला देण्यात आले आहे. त्यामुळे आशियाई विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेचा विचार पुढे आला. लवकरच आम्ही हा प्रस्ताव तयार करून एआययुकडे पाठवणार आहोत. यजमानपद मिळाल्यास ही स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी २०२३ मध्ये आयोजित करण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.

राज्य विद्यापीठ क्रीडा महोत्सवही होणार

सध्या विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरू झाले असून येत्या नऊ महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास सूर्यवंशी यांनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे २०२३ मध्ये नागपुरात होणाऱ्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धा नवीन सिंथेटिक ट्रॅकवर होतील. यापूर्वी नागपूर विद्यापीठाने १९९० मध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री तर २०१२-१३ मध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन केले होते.

loading image
go to top